वेकोलिच्या कोळसा खाणीतील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:29 AM2021-04-09T04:29:50+5:302021-04-09T04:29:50+5:30
कोळसा खाणीत कामगारांच्या जीवाला धोका नितीन मुसळे / प्रकाश काळे सास्ती / गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या ...
कोळसा खाणीत कामगारांच्या जीवाला धोका
नितीन मुसळे / प्रकाश काळे
सास्ती / गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा व्यवस्थेचे बारा वाजल्याने कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोवनी २ कोळसा खाणीत कंत्राटी कामगाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने राजुरा तालुक्यातील सर्वच कोळसा खाणींची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
वेकोलित वारंवार घडणाऱ्या अपघाताने वेकोलि अधिकाऱ्यांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामगारांच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी २, गोवरी डीप या वेकोलिच्या कोळसा खाणीत वेकोलिकडून वर्षाकाठी मोठ्या प्रमाणात कोळशाचे उत्पादन घेतले जाते. परंतु कामगारांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वेकोलित वारंवार अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.मागील महिन्यात सास्ती कोळसा खाणीत डंपर उलटल्याने अक्षय खडतर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच चार दिवसांपूर्वी पोवनी २ कोळसा खाणीत मोटारपंप काढण्यासाठी गेलेला वरोडा येथील विशाल हंसकर या युवकाचा कोळसा खाणीतील पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दोन युवक सुदैवाने बचावले. वेकोलिच्या कोळसा खाणीत वारंवार अपघात का घडत आहे, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ वेकोलि अधिकाऱ्यांवर आली आहे.
वेकोलित सुरक्षा साधनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. परंतु हेल्मेट, जोडे, सुरक्षा किट व इतर सुरक्षा साधनांचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नियम धाब्यावर बसवून वेकोलि प्रशासन कामगारांकडून काम करवून घेत आहे. याकडे वेकिलीचे जबाबदार अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.
बॉक्स
सुरक्षेसाठी लाखोंचा निधी, पण सुरक्षा नाही
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी वेकोलि प्रशासन लाखो रुपये खर्च करीत असल्याची माहिती आहे. असे असतानाही कामगारांना कोळसा खाणीत सुरक्षा का दिली जात नाही, या प्रश्नाचे उत्तर वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे नाही. वेकोलि कामगारांच्या सुरक्षेत कसूर करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बाक्स
वेकोलित सुरक्षा सप्ताहाचा केवळ गाजावाजा
वेकोलिने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना केवळ सुरक्षा सप्ताह दरम्यान वेकोलित कामगारांच्या सुरक्षेचा गाजावाजा करून सुरक्षिततेचा आव आणला जातो. मात्र हा नाममात्र देखावा करून वेकोलिचे अधिकारी गप्प बसतात.