करडई पिकाची केंद्रीय शास्त्रज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:17+5:302021-02-08T04:25:17+5:30
वरोरा : हैदराबाद येथील भारतीय तेल बिया संशोधन केंद्रामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जवाहरलाल व डॉ. सतीश राव यांनी वरोरा ...
वरोरा : हैदराबाद येथील भारतीय तेल बिया संशोधन केंद्रामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जवाहरलाल व डॉ. सतीश राव यांनी वरोरा उपविभागातील वरोरा व चिमूर तालुक्यातील करडई पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली व तांत्रिक मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच करडई पिकाची लागवड करण्यात आली. रब्बी हंगामात हरभरा गहू या पिकावरील उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तेलवर्गीय पिकाची वाढती मागणी लक्षात घेता व आपल्या परिसरात नवीन पीक लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी करडई पीक प्रात्यक्षिक वर भर देण्यात आला. फारच कमी उत्पादन खर्च असलेले कमी पाण्यात उत्पादन देणारे काटेरी गुणधर्मामुळे जंगली जनावरांपासून धोका नसलेले आरोग्यास उपयुक्त व गुणकारी बाजार भावसुद्धा योग्य असलेले पीक करडईची वर्धा तालुक्यात ५० एकर लागवड करण्यात आली. पिकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन व पाहणी करण्याकरिता केंद्रीय शास्त्रज्ञांनी वरोरा तालुक्यातील मेसा, वाघोली येथील शेतकरी पवन भारतीने, वडगाव येथील शेतकरी माणिक भोयर यांच्या शेताला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून येणाऱ्या अडचणी व उपाय सुचविले. त्यानंतर चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील तालुका बीज गुणन केंद्र व पांढरवनी येथील शेतकरी वाघमारे यांच्या शेतातील कारले पिकाची पाहणी केली. याप्रसंगी वरोरा तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश, कृषी अधिकारी गोंधळी, मंडळ कृषी अधिकारी विजय काळे उपस्थित होते.