जलयुक्त शिवारमुळे सागरा झाले सागर !
By admin | Published: July 8, 2015 01:15 AM2015-07-08T01:15:41+5:302015-07-08T01:15:41+5:30
कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
३२५ एकर क्षेत्र संरक्षित ओलीत : ६ जुन्या सिमेंट बांधांमध्ये ३६ टीएमसी पाणी
चंद्रपूर : कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भद्रावती तालुक्यातील सागरा गावात कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. सह जुन्या सिमेंट बांध खोलीकरणामुळे शिवारातील शेतीला शाश्वत सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. जुन्या सिमेंट बांधामध्ये ३६ टीएमसी पाणी साठा असून ३२५ एकर क्षेत्रावर संरक्षीत ओलीत होणार आहे. पावसाच्या दडीमुळे पिकांना आवश्यक असलेले पाणी या बांधामधून प्राप्त होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता सध्या तरी मिटली आहे.
सागरा हे गाव जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असून विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातही या गावचा समावेश आहे. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमातंर्गत सागरा परिसरात ६४ शेततळे घेण्यात आली आहेत. हे शेततळे सद्या काठोकाठ भरली असून शेततळ्यात ७६ टीएमसी पाणीसाठा आहे. यावर्षी जलयुक्त शिवार मध्ये ६ जुने सिमेंट बांध खोलीकरण करण्यात आले असून या बांधामध्ये मुबलक पाणी साठल्याने पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होणार आहे.
सागरा हे गाव कोरडवाहू क्षेत्रात येत असल्यामुळे या ठिकाणी सिंचनाच्या सोई अपुऱ्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात बांधण्यात आलेल्या ६४ शेततळ्यांमुळे सिंचनाची सोय उपलब्ध झाली. (स्थानिक प्रतिनिधी)