किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी सह्यांद्रीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:10 AM2017-09-28T00:10:34+5:302017-09-28T00:11:15+5:30
जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे. अशातच पुण्यातील सह्यांद्री प्रतिष्ठानने किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. सह्यांद्रीच्या चंद्रपूर शाखेने बल्लारपूर येथील राजे बल्लाळशहाचा किल्ला नुकताच स्वच्छ केल्याने किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सह्यांद्री प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्ष अनुश्री घोटेकर, जिल्हा सचिव संजय अनेजा, तालुकाध्यक्ष निमेश मानकर, संपर्क प्रमुख सचिन आवारी व प्रसिद्धी प्रमुख प्रकाश हांडे, राजपालसिंह मितर पुरातत्व विभागाचे पसिने, मुख्याधिकारी विपीन मुध्दा यांनी पुढाकार घेतला.
मोहिमेदरम्यान गडावरील टाके स्वच्छता, वाटा दुरुस्ती करण्यात येऊन किल्लावर किल्ल्याच्या इतिहासाचा माहितीफलक, सूचना फलक, दिशादर्शक तसेच वास्तुदर्शक तक्ते लावण्याचे कार्य करण्यात आले. प्रारंभी गडपूजन करण्यात आल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी पसिने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यानंतर किल्ल्यातील आतील दुर्ग अवशेषांची पाहणी करुन इतिहास माहिती फलकाचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम भारतीय सर्वेक्षण पुरातत्व विभागाच्या अनुमतीने राबविण्यात आला. सह्यांद्री प्रतिष्ठाणने राज्यातील अनेक किल्ले यापूर्वी स्वच्छ केले आहे.