साई आयटीआयची आज कार्यालयीन चौकशी
By admin | Published: March 7, 2017 12:35 AM2017-03-07T00:35:34+5:302017-03-07T00:35:34+5:30
येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असल्याने ...
तीन सदस्यीय समिती : व्यवसाय व शिक्षण संचालनालयाचे पथक
चंद्रपूर : येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ताराशक्ती आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीतही गैरप्रकार आढळून आल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ही समिती मंगळवारी साई आयटीआयच्या कार्यालयीन चौकशीसाठी चंद्रपुरात दाखल होत आहे.
विद्यार्थ्यांनी गैरप्रकार होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे केली होती. साई आयटीआय येथे आयटीआयच्या परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. ताराशक्ती आयटीआयचे परीक्षा केंद्रसुद्धा येथेच देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन २३ फेब्रुवारीला झालेला पेपर तब्बल दोन तास उशिराने देण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली.
ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले, त्यांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करण्यात आली. तर ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात आली, असा आरोप केला होता. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यांना लघुशंकेसाठी बाहेरही जाऊ दिले नाही, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. शिवाय परीक्षा केंद्र बदलवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. समितीने चौकशी केली. समितीने सादर केलेल्या अहवालातही गैरप्रकार होत असल्याचे नमूद असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित करून चौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही समिती मंगळवारी चंद्रपुरात दाखल होवून साई आयटीआयची कार्यालयीन चौकशी करणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्राचार्य व केंद्रप्रमुखावर टांगती तलवार
साई आयटीआयच्या चौकशीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीत भंडारा येथील व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, बल्लारपूर येथील आयटीआयचे प्राचार्य व आयटीआयच्या नागपूर प्रादेशिक मुख्यालयातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तिनही सदस्य साई आयटीआयची मंगळवारी कार्यालयीन चौकशी करणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास आयटीआयचे प्राचार्य पेशट्टीवार व केंद्रप्रमुख रासेकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.