इथे होतात संत, महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथी श्रमदानातून साजऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:44+5:302021-07-26T04:25:44+5:30
राष्ट्रसंताच्या तपोभूमीत श्रमदानातून उत्सव साजरे राजकुमार चुनारकर चिमूर : अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ...
राष्ट्रसंताच्या तपोभूमीत श्रमदानातून उत्सव साजरे
राजकुमार चुनारकर
चिमूर : अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) येथे अनेक महिन्यांपासून अनेक संत, महात्म्याच्या जयंती, पुण्यतिथी व धार्मिक सण, उत्सव श्रमदान व वृक्षारोपण करून साजरे करण्यात येतात.
चिमूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंदेडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक महिने साधना करून, चिमूर तालुक्यातील नागरिकांत इंग्रज सत्तेविरुद्ध लढण्याचे बीज रोवले. सोबतच भजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याच्या दृष्टीने नागरिकांत जागृती निर्माण केली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मोझरी ते चंद्रपूर जिल्ह्यातील गोंदेडा या परिसरात अनेक गावांत गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून सामुदायिक प्रार्थना करण्यात येतात. या मंदिरातूनच गुरुदेवांच्या विचाराचे प्रसार, प्रचार करण्यात येतात. त्यामुळे या परिसरात अनेक गुरुदेव भक्त गावागावांत आहेत.
गुरुदेवांची तपोभूमी असलेल्या गोंदेडा या हजार-पंधराशे लोकवस्तीच्या गावात घराघरांत गुरुदेव भक्त आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कुरखेडा येथून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रा.नीळकंठ लोंनबले, सुधाकर चौधरी, देवराव धारने, संजय धारने, चंद्रभान बारेकर, अनिल गुरनुले, मुरलीधर शेंडे, प्रभू धारणे यांच्या पुढाकाराने गावात होणाऱ्या प्रत्येक संत, महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथी व धार्मिक सण हे तपोभूमीत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, मातीकाम अशा प्रकारचे श्रमदान करून साजरे केले जातात.
एके काळी डोंगराळ व पाण्याचा दुष्काळ असलेली साधना भूमी गुरुदेव भक्तांच्या श्रमदानातून आता पाणीदार व वृक्षसंवर्धनाने बहारदार झाली आहे.
बॉक्स
श्रमदानातून दिनचर्या
सेवानिवृत्त प्राध्यापक नीळकंठ लोनबले यांनी स्वतःपासून सुरू केलेल्या श्रमदानाच्या प्रेरणेने गोंदेडा येथील गावकरी, महिला व युवक, तसेच खांबाला, मदनापूर, वडसी, नेरी, मोटेगाव, नवर्गाव, पेंढारी परिसरातील युवक, महिलाही श्रमदान करीत आहेत.
बॉक्स
या कार्यक्रमात होते श्रमदान
महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, जागतिक महिला दिन, नूतन वर्ष, वटसावित्री, होळी, दिवाळी, पोळा, दसरा, गुरुपौर्णिमा आदी धार्मिक सणालाही येथे श्रमदान करण्यात येते.