बल्लारपूरलगत साकारतेय रानमेव्याचे वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:18+5:302021-06-26T04:20:18+5:30
साडेबारा एकर जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे लावली मंगल जीवने बल्लारपूर : विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची आणि ...
साडेबारा एकर जागेवर १२ हजार ५०० मिश्र फळांची झाडे लावली
मंगल जीवने
बल्लारपूर : विविध प्रकारच्या आजाराशी लढण्याची आणि ती समूळ नष्ट करण्याची क्षमता व अद्भुत शक्ती रानमेव्यात आहे. यासाठी रोगातून पूर्णपणे मुक्ती मिळवायची असेल, तर वनौषधींचा आधार घेतला पाहिजे, असे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे. अशा रानमेव्याचा पर्याय आता बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत बल्लारपूर लगत असलेल्या मानोरा, उमरी, कवडजई ट्री पॉइंटवरील क्षेत्रात उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी रानमेव्याचे वन साकारत असून, याचा लाभ त्या परिसरातील लोकांना रोजगारासाठी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यांसाठी व रानमेव्याची चव चाखणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.
मानोरा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ४४९ मध्ये पावसाळ्यात लावलेल्या या रानमेव्याच्या वृक्ष लागवडीत विविध ४० मिश्र फळझाडांचे ५ फूट वाढलेली १२ हजार ५०० रोपे साडेबारा एकर पडक्या जमिनीवर लावण्यात आली आहे. यामध्ये वन्य प्राण्यांना आवडणारी, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याच्या कामी येणारी व रानफळे चवीने खाणाऱ्या शहरी व ग्रामीण नागरिकांची आवडती फळे आहेत. यामध्ये औषधीच्या कामी येणारी कुंभी, मोहा, हिरडा, आवळा, गुंजा, रिठा, करू, अर्जुन, गूळ भेंडी, घोगर, तर रानमेवा खाणाऱ्यांसाठी बेल, आंबा, तेंदू, शेवगा, चिंच, जांभूळ, उंबर, कवट, बिबा, चारोळी, बादाम, खिरणी, टेटू, डाळिंब, सीताफळ, बोर, जांभ, वन्य प्राण्यांसाठी अमलतास, काकई, शिवण व इतर फळझाडे, प्राणवायू मिळण्यासाठी पिंपळ, वड अशी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहे. ही रोपे विसापूर, मानोरा, उमरी या उपक्षेत्रात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे व वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली.
सदर रोपवन लावण्यात मानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच जीवनकला ढोंगे, उपसरपंच लहुजी टिकले, सदस्य ऋषी पिपरे व इतर सदस्यांचा सहभाग होता.
बॉक्स
संरक्षण जाळी लावून होणार संवर्धन
सर्व झाडांना संरक्षण जाळी लावून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. लावलेल्या या रानमेवा फळझाडांचा मानोरा व आजूबाजूंच्या ग्रामवासीयांना चार वर्षानंतर लाभ मिळणार आहे. यापासून त्यांना रोजगार प्राप्त होणार आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रात पहिल्यांदाच असे अनोखे रोपवन संतोष थिपे यांच्या कल्पनेतून साकारण्यात आले असून, भविष्यामध्ये हे रोपवन सर्वांसाठी प्रभावी ठरेल.
कोट
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणत, या रोपवनाशी गावकऱ्यांना वृक्षांशी नाते जोडण्याचा संदेश आम्ही दिला आहे. येथील जनतेने हा वसा जपला पाहिजे. मानोरा गावाला लागून हे रानमेव्याचे रोपवन असल्यामुळे या परिसराची शोभा वाढणार आहे. यासाठी सर्वांनी वृक्षाचे संगोपन, निगा व संवर्धनासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. तेव्हाच रानमेव्याची हे वन यशस्वी होईल.
- संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर.