राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत सखी आणि सृष्टीने गाजवले मैदान
By साईनाथ कुचनकार | Published: January 17, 2024 05:22 PM2024-01-17T17:22:55+5:302024-01-17T17:23:22+5:30
चांदा पब्लिक स्कूलच्या सखी पांडुरंग दोरखंडे व सृष्टी प्रकाश बल्की सहभागी होत नेत्रदीपक कामगिरी बजावली.
साईनाथ कुचनकार,चंद्रपूर : ओडिसा राज्य शालेय क्रीडा संघटना आणि एम.ई. विभाग ओडिसा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६७ वी राष्ट्रीय शालेय खेळ व्हॉलिबॉल स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चांदा पब्लिक स्कूलच्या सखी पांडुरंग दोरखंडे व सृष्टी प्रकाश बल्की सहभागी होत नेत्रदीपक कामगिरी बजावली.
या शालेय क्रीडा खेळ स्पर्धेत १४ वर्षांखालील व्हॉलिबॉल स्पर्धेत सी.बी.एस.ई.कडून सखी पांडुरंग दोरखंडे हिने उपांत्य फेरीत तामिळनाडू संघाला हरवून अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर विजय प्राप्त केला. अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. या यशासाठी विजयी संघातील खेळाडूंना स्पर्धा स्थळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रशस्ती पत्र प्रदान करून कौतुक केले. सृष्टी प्रकाश बल्की हिने १४ वर्षांखालील व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. शाळेच्या संचालिका स्मिता संजय जिवतोडे व प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी दोघींचाही सत्कार केला.
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या सखी दोरखंडे व सृष्टी बल्की या खेळाडूंना क्रीडाशिक्षक विनोद निखाडे, अमर कडपेवाले, रमेश कोडारी, जयंती मद्देला, प्रणोती चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले, तर विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.