बरांज तांडा परिसरात सर्रास दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:35 AM2019-04-22T00:35:35+5:302019-04-22T00:36:01+5:30
शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात दारूबंदी जिल्हा असली तरी भद्रावती तालुक्यात देशी व विदेशी दारू सहजपणे उपलब्ध होते. तर दुसरीकडे बरांज तांडा परिसरातील हातभट्टीवर दारू काढण्याचे प्रमाण वाढले. देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने मद्यपींनी बरांज तांडाकडे मोर्चा वळविला. दरम्यान, पोलिसांनी अनेकदा धाडी टाकून आरोपींना जेरबंद केले. कित्येकदा विशेष मोहीमसुद्धा राबविली. परंतु दारु काढणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरातील बºयाच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले. काहींनी तुरूंगवास भोगला पण दारूचा व्यवसाय अजुनही बंद केला नाही.
तालुक्यात रोजंदारी करणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले. गावठी दारू सहज मिळू लागल्याने युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली. तालुक्यात मिळणारी देशी व विदेशी दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मद्यपी आता बरांज तांडा येथे जात आहेत. यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तांड्यावरील दारूची मागणी वाढली आहे. हातभट्टीची दारू काढण्यासाठी प्रामुख्याने मोह फुलाची आवश्यकता असते. परंतु हातभट्टी दारूची मागणी लक्षात घेऊन जंगलातील सळलेला पाला पोचाळा, विशिष्ट झाडांच्या साली तसेच विविध प्रकारच्या रासायनांचा वापर केला जात आहे. परंतु मद्यपी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. गावठी दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडले. कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला. परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत. ही दारू केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यातून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पोलिसांकडून कारवाई होऊनही दारू का बंद झाली नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
व्यसन मुक्ती शिबिर सुरू करा
जिल्हा दारुबंदी होवून पाच वर्षे होत आहे. दारूबंदीपूर्वी नागरिकांच्या आरोग्याचा विषय पुढे करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशंसा व मते मिळविलजी. पण, बंदीनंतरही सुरू असलेल्या दारु विक्रीच्या प्रश्नावरून पोलिसांवर दबाव वाढविला नाही. बरांज तांडा येथील हातभट्टीची दारु पिऊन शेकडो नागरिकांचे आरोग्य बिघडले. काही व्यक्तींचा मृत्यू झाला. परंतु शासनाने या पाच वर्षात एकही व्यसन मुक्ती शिबिर राबविले नाही. यामुळे कागदावरील दारूबंदीविषयी महिला संताप व्यक्त करीत आहेत.