बालकांच्या हाताने केली जाते दारू विक्री
By admin | Published: April 30, 2017 12:37 AM2017-04-30T00:37:32+5:302017-04-30T00:37:32+5:30
जिल्हा दारूबंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण कायदा व अंमलबाजवणी करणारेच सुस्त असल्याने याचा समाजात मोठा वाईट परिणाम पाहावयास मिळत आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष : निष्पाप बालके होताहेत सराईत गुन्हेगार
वरोरा : जिल्हा दारूबंदी होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण कायदा व अंमलबाजवणी करणारेच सुस्त असल्याने याचा समाजात मोठा वाईट परिणाम पाहावयास मिळत आहे. ‘गरिबीच्या आड वाढतंय दारू विक्रीच झाड’ अशीच काहिशी परिस्थिती सध्या शहरात पहावयास मिळत आहे. दारू विक्री करणाऱ्यांनी शक्कल लढवित बालकांच्या मदतीने शहरात दारूविक्री सुरु केली आहे.
शहरातील आठवडी बाजारात सकाळला व सायंकाळी दारू विक्री करणाऱ्या बालकांचा मेळा भरतो. भाजीपाला विकावा तशी दारू विक्री केली जाते तर येणाऱ्या-जाणाऱा व्यक्तींना ैै‘ओ काका कोणती पाहिजे’ असा आवाज आल्यास तो दुसऱ्या कशाचा नाही तर तुम्हाला दारू कोणती पाहिजे हे विचारणारा आवाज असतो. आवाज ऐकून आपण थबकला तर लाल पाहिजे का पांढरी असाही सूर त्यांच्या मुखातून ऐकायला मिळते.
शहरात खुलेआम दारू विक्री हा नवीन विषय नाही. शहरातील विविध चौकात दररोज दारू विक्रेत्यांचा मेळा भरत असतो. हम यहा के सिकंदर म्हणत काही दारू विक्रेते कुणालाही न जुमानता खुलेआम दारू विक्री करीत असतात. या अवैध दारू विक्री आणि तस्करीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल महिन्याला होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात पोलिसांचे हात ओले होत असल्याची खमंग चर्चाही शहरात सुरु आहे. दारू विक्रेते आणि तस्कर अवैध्य दारूच्या व्यवसायात व्यस्त असून पोलीस सुस्त असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. किरकोळ विक्री करणारे व एखादी दारूची बाटली असणाऱ्या व्यक्तींवर केसेस करून आम्ही दारूच्या केसेस करण्यात सर्वात समोर असल्याचा दिखावा येथील अधिकारी वरिष्ठांसमोर करीत असल्याचे दिसत आहे. पण शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असणाऱ्या दारू विक्रीचे काय? असा सवालही आता नागरिक करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसाआगोदर दारू विक्री करणाऱ्या महिलेकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. हा घडलेला प्रकारही वरोरा पोलिसांनी अवैध्य दारू विक्रीसाठी केलेल्या नवीन नियमाच्या विरोधात होता, अशीही चर्चा शहरात सुरु आहे. जे वय शिक्षण घ्यायचे आहे, ज्या वयात त्यांना खेळायचे आहे, त्या वयात गुन्हेगारीकडे वाढणारे हे हात भविष्यात सराईत गुन्हेगाराचे ठरल्यास नवल वाटू नये. या प्रकाराला आताच आळा घातला नाही तर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
शहरात सुरु असणाऱ्या दारू विक्रीकडे स्थानिक पोलीस डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरातील अवैध दारू विक्री वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी स्पेशल स्काड वरोरा शहरात पाठवावा व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.