रानवेली गावात सिलिंगच्या जमिनीची कवडीमोल किमतीत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:52+5:302021-06-03T04:20:52+5:30
एवढी किमती शेतजमीन स्वस्त दरात विकण्याचा सौदा झाल्याने संशय बळावला आहे. दरम्यान त्या शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित दोन ठिकाणी शेतजमीन असताना ...
एवढी किमती शेतजमीन स्वस्त दरात विकण्याचा सौदा झाल्याने संशय बळावला आहे. दरम्यान त्या शेतकऱ्यांकडे वडिलोपार्जित दोन ठिकाणी शेतजमीन असताना वर्ग २ च्या जमिनीचे गूढ गुलदस्त्यात आहे. परिणामी या कवडीमोल सौद्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा, असा संशय व्यक्त होत आहे. सध्या रानवेली शिवारातील जमिनीच्या सौद्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुळात त्या परिसरात शेतजमिनीचा दर सात ते आठ लाख रुपये प्रति एकर असा आहे. पण जो सौदा झाला आहे, त्या जमिनीला तीन लाख ३६ हजार असा कवडीमोल दर ठरला आहे. त्यामुळे एवढ्या स्वस्त किमतीत खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याने अनेकांच्या पोटात कालवाकालव सुरू झाली आहे. मुळात सौदा झालेली जमीन ही वर्ग २ मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यवहारासाठी परवानगी घ्यावी लागते. पण त्या शेतकऱ्यांकडे वरूर व भेदोडा शिवारात वडिलोपार्जित शेती असल्याची माहिती समोर येत आहे. असे असताना वर्ग २ ची जमीन सिलिंगमध्ये मिळाली आहे. जर का असा प्रकार असेल तर ती जमीन सरकार जमा होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.