हताश शेतकऱ्यांच्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:06 PM2018-04-16T23:06:09+5:302018-04-16T23:06:28+5:30

Sale of desperate farmers' livestock | हताश शेतकऱ्यांच्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री

हताश शेतकऱ्यांच्या जनावरांची कवडीमोल भावात विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : बैलबाजारावर मंदीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणजे बैल. शेतकरी वर्षभर बैलाला जिवापाड जपतो. कसदार मातीतून सोनं पिकविण्यासाठी बैलाचे मोठे योगदान असते. परंतु, यावर्षी बोंडअळी व विविध रोगांनी पिकांना ग्रासल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वर्षभर जीवापाड जपलेल्या ढवळ्या-पवळ्याची कवडीमोल भावात विक्री करीत आहे. बैलबाजारावर सध्या मंदीचे सावट असून याचा फायदा दलाल घेत आहेत.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. शेतात वर्षभर राबूनही शेवटी हाती काहीच लागले नाही. हा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर ओढविलेली परिस्थिती अतिशय भयावह आहे. शेतकऱ्यांना यावर्षी पूर्णत: बोंडअळीने हैराण करून सोडल. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी शेती करण्यालाच ब्रेक दिला आहे.
शेतकºयांसमोर कर्जाचा डोंगर वाढत असताना दरवर्षी शेतीला येणारा तोटा शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सहन करायचा म्हणून नाईलाजाने शेती करण्यालाच नकार देत आहे. अशातच पाळीव जनावरांचा खर्च पेलत नसल्याने व त्याच्या चाऱ्याचा प्रश्न असल्याने वर्षानुवर्षे जीवापाड जपलेल्या बैलांची कवडीमोल दरात विक्री केली जात आहे. त्याचा पुरेपूर फायदा खासगी दलाल घेत असून अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांकडून बैलाची खरेदी करण्यात येत आहे.
बैलजोडीच्या किंमती एक लाख रुपयापर्यंत गेल्या आहेत. परंतु, खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांनी बैलांच्या किमती कमी करून शेतकºयांकडून मिळेल त्या पडत्या भावात बैलांची खरेदी करणे सुरू केले आहे.
परप्रांतात बैलाची विक्री
शेतकºयांकडून कमी दरात बैलजोडी खरेदी करून परप्रांतात त्या बैलाला विकणारी टोळी या भागात सक्रिय झाली आहे. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून बैलांची अर्धी किंमतही दिली जात नसल्याचे दिसून येते.

Web Title: Sale of desperate farmers' livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.