बंदीनंतरही लाखोंच्या खर्राची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:48 PM2018-03-19T23:48:41+5:302018-03-19T23:48:41+5:30
ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही चंद्रपुरात दररोज लाखोंचा खर्रा फस्त केला जात आहे. सिगारेट, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा खप वेगळाच. नागरिकांवर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा हा विळखा निश्चितच गंभीर आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली आहे. यातील ३७ टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील १५ टक्के सख्या महिलांची आहे. चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात दोन हजारांच्या जवळपास पानटपºया आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात, अशी माहिती आहे. यातील काही पानटपऱ्यांमधून दररोज २०० ते ३०० खर्रे विकले जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. गल्लीबोळातील पानटपऱ्यांमधून एका दिवसात एवढ्या खºर्यांचा खप होत नसला तरी ७५ ते १५० खर्रे तिथूनही विकले जातात. या माहितीवरून सरासरी १०० खर्रे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खऱ्य ची किमत १० ते २० रुपये, याप्रमाणे दोन हजार पानटपरीमधून दररोज लाखोंचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क खर्रा चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणाºयांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो.
विशेष म्हणजे, शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. पोलीस व अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकार दिले आहे. असे असले तरी सुगंधित तंबाखू व त्याचे खर्रे सर्रास विकले जात आहे. तक्रार आलीच की एखाददुसरी कारवाई केली जाते. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे.
आरोग्य धोकादायक वळणावर
आधीच औद्योगिकरणामुळे चंद्रपूरचे प्रदूषण देशाच्या पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणाचा सरळसरळ परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. आता तरुणांपासून वयोवृध्द व महिलांपर्र्यत तंबाखूजन्य पदार्थाचा विळखा पोहचल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.
बंदीचा केवळ फुगाच
शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. मात्र अगदी डोळ्यादेखत खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री पानटपऱ्यांमधून केली जात असतानाही हा विभाग आपल्याच कार्यालयात अडकून पडला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या बंदीचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते.
पालकांचे दुर्लक्षही कारणीभूत
अलिकडे मुलगा अगदी लहानवयातच गंमत म्हणून खर्रा खायला लागतो. कधी सिगारेटही ओढतो. पाल्यांचे हे कृत्य प्रत्येक वेळी घराबाहेरच होत असतात असे नाही. घरीदेखील खºर्याचा पालकांना वास येतोच. मात्र याकडे पालक दुर्लक्ष करतात. काही जण याबाबत विचारणा करतातही; मात्र बाब गंभीरतेने घेतली जात नाही. पुढे गंमत म्हणून केलेले हे व्यसन मुलांना व्यसनाधीन करून टाकते.
कायदा होणार कडक
गुटखाबंदीबाबत अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यात गुटखाबंदीचा कायदा आणखी कडक केला जाईल, असे सांगितले होते. यासोबतच सुगंधी सुपारी, तंबाखू यांचे मिश्रम म्हणजे खºर्याला गुटखाबंदीचे नियम लागू होतील, असे म्हटले होते. नियमाचे उल्लंघन करणाºयांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. याबाबत कठोर कायदा झाल्यानंतर त्याची तरी अंमलबजावणी गांभीर्याने व्हावी, अशी अपेक्षा आहे.
अलिकडच्या काळात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे गंभीर बाब आहे. मुखरोग व कर्करोगाचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. दररोज कर्करोगाचे रुग्ण डिटेक्ट केले जात आहेत. अशा परिस्थितीमुळेच शासनाने गुटखा व खºर्यावर बंदी घातली आहे. याची गांभीर्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरूणाईनेही व्यसनाच्या आहारी न जाता सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा यापासून दूर राहिले पाहिजे.
-यू. बी. मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.