बंदीतही थर्माकोलची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:57 AM2019-09-05T00:57:45+5:302019-09-05T00:58:04+5:30
प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे मागील वर्षी शासनाने थर्माकोल व प्लास्टिवर बंदी घातली. तरीसुद्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलची विक्री सुरु आहे. गणेशोत्सवामध्ये अनेकजण थर्माकोलद्वारे सजावटीला पसंती देतात. बहुतेक ठिकाणी मोठे देखावे थर्माकोलच्या सहय्याने तयार केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सवानिमित्त चंद्रपुरातील बाजारपेठ फुलली आहे. मात्र यामध्ये बंदी असलेल्या वस्तूही विक्रीला आहेत. थर्माकोलवर शासनाने बंदी घातली आहे. तरीसुद्धा थर्माकोलची सर्रास विक्री सुरु असून याकडे मनपाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे मागील वर्षी शासनाने थर्माकोल व प्लास्टिवर बंदी घातली. तरीसुद्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलची विक्री सुरु आहे. गणेशोत्सवामध्ये अनेकजण थर्माकोलद्वारे सजावटीला पसंती देतात. बहुतेक ठिकाणी मोठे देखावे थर्माकोलच्या सहय्याने तयार केले जाते. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशाची स्थापना करण्यात येते. यासाठी तर थर्माकोलचा मखर तयार करण्यात येतो. ही बाब हेरुन चंद्रपुरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात थर्माकोलची विक्री केली जात आहे. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सार्वजनिक महाप्रसाद, घरगुती जेवणाचे वितरण केले जाते. त्यासाठी प्लास्टिक ग्लास, वाटी, प्लेटची गरज पडते. त्यामुळे बाजारपेठेत या वस्तुसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यांची सर्रास विक्री सुरु आहे. याकडे मात्र महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कारवाई थंडावली
प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातल्यानंतर मनपातर्फे शहरात अनेक ठिकाणी जनजागृती फलके लावण्यात आले होते. त्यानंतर विशेष पथक तयार करुन शहरातील काही व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र आता मोठ्या प्रमाणात विक्री होत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.
विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष
शहरात गणपती सजावट तसेच मोठे देखावेही थर्माकोलच्या सहय्याने केले जातात. मात्र गणपती विसर्जनादरम्यान थर्माकोल इतरत्र टाकण्यात येत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. थर्माकोल हलके असल्याने ते हेवद्वारे इतरत्र पसरतात. मात्र मंडळांकडून त्याची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.