विक्रीची परवानगी मिळाली; आता दारूची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:12+5:302021-07-05T04:18:12+5:30

चंद्रपूर : राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने परवाने देणे सुरू केले. जिल्ह्यात ९८ दारू परवाने मिळाले ...

Sales allowed; Now wait for the liquor | विक्रीची परवानगी मिळाली; आता दारूची प्रतीक्षा

विक्रीची परवानगी मिळाली; आता दारूची प्रतीक्षा

Next

चंद्रपूर : राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने परवाने देणे सुरू केले. जिल्ह्यात ९८ दारू परवाने मिळाले असून सोमवारी आणखी ५० जणांना परवानगी मिळणार आहे. ज्यांना परवानगी मिळाली आहे, ते दारू विकण्यास मोकळे झाले आहे. मात्र त्यांच्याकडे दारूचा स्टाॅक नाही. शनिवार, रविवारी टाळेबंदी असल्याने परवानाधारक परवानगी मिळूनही दारूची आयात करू शकले नाही. मात्र सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अधिकृत दारू येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दारूची दुकानातून विक्री सुरू होणार आहे.

बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होणार आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने एक खिडकी सुरू केली असून त्या माध्यमातून दारू दुकानांना परवाने मंजूर केले जात आहे. विशेष म्हणजे, परवाना अर्जातील त्रुटी दुुरुस्त करून जिल्ह्यात ९८ दारू परवाने मंजूर करण्यात आले असून संबंधितांच्या हातात परवाने पोहचले आहे. मात्र कोरोना निर्बंधामुळे शनिवार तसेच रविवार कडक बंद पाळला जात आहे. परवाने मिळूनही दारूच्या अधिकृत डीलर्सकडे मागणी नोंदविताच आली नाही. परिणामी सोमवारी नोंदणी करून अधिकृत दारू जिल्ह्यात पोहचणार आहे. मात्र यासाठी किमान दुपारपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे.

विशेष म्हणजे, कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने निर्बंध घातले आहे. त्यानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतात.

बाॅक्स

रंगरंगोटी अंतिम टप्यात

परवानगी मिळताच दारू दुकानांची रंगरंगोटी तसेच स्वच्छता आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील बार तसेच दारू दुकाने आता सजली आहे. विशेष म्हणजे, शहराबाहेरील ज्या बारच्या इमारती मागील सहा वर्षांपासून धूळ खात पडल्या होत्या. त्या इमारतीही आता चकाकू लागल्या आहेत.

बाॅक्स

नोकरांसाठी धावपळ

जिल्ह्यात ९८ दारू दुकानांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी व्यवस्था अपडेट करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी नोकरांची मागणी वाढली आहे. मात्र जे जास्त पगार देणार त्यांच्याकडे नोकरवर्ग जात असल्यामुळे व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे.

बाॅक्स

होलसेल विक्रेता नाही

जिल्ह्यामध्ये दारू विक्रीसाठी होलसेल विक्रेता नाही. त्यामुळे नागपूर किंवा इतर जिल्ह्यांवर येथील व्यावसायिकांना अवलंबून रहावे लागते. त्यामुळे परवानगी मिळूनही नागपूर येथून दारू आणण्यासाठी किमान चार ते पाच तास वेळ लागू शकतो. परिणामी सोमवारी दुपारपासून अधिकृत दारू विक्री सुरू होईल, असा अंदाज आहे.

बाॅक्स

मद्यपीमध्ये आनंद

जिल्ह्यात अधिकृत दारू दुकाने सुरू होत असल्याने मद्यपींमध्ये आनंद आहे. केव्हा एकदा वैध दारू विक्री सुरू होते आणि केव्हा प्यायला मिळते, असे मद्यपींचे झाले आहे.

बाॅक्स

जरा सांभाळून...

जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होत आहे. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारू सुरू झाली म्हणून सैराट होणे चुकीचे असून आपल्यामुळे समाज तसेच कुटुंबातील व्यक्तींना त्रास होऊ नये, असे वागणे योग्य ठरेल.

Web Title: Sales allowed; Now wait for the liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.