खरिपाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची विक्री
By admin | Published: June 7, 2017 12:46 AM2017-06-07T00:46:07+5:302017-06-07T00:46:07+5:30
सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत.
कृषी विभागाने लक्ष द्यावे : शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या खरिप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकरी मशागत व बियाणे खरेदीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र याचा फयदा घेत काही व्यापारी व दलालांनी अनाधिकृतपणे कृषी विभागाकडून कसलीही मान्यता नसताना सर्रास शेतकऱ्यांना तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरात राज्यातील बोगस बियाणे शेतकऱ्यांना दुप्पट किंमतीने विकत असल्याचा प्रकार सीमावर्ती भागात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुट व फसवणूक होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
शासनाने काही कंपन्यांच्या बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र जिवती, कोरपना तालुक्यात काही व्यापारी व दलालांनी ‘चोर बिटी’ या नावाची बियाणे अवैधरित्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेतकऱ्यांकडून दरवर्षी बिटी बियाण्यांची मोठी मागणी असते. मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही. परिणामी बियाण्यांचा काळाबाजार होवून शेतकरी भरडले जातात. शिवाय परराज्यातून देखील बियाणे आणून त्याची दुकानदाराकडून जादा दराने विक्री केली जाते.
या बियाण्यांबद्दल लोकांमध्ये आमिष दाखवून गवत उगवत नाही, मजुरांचा खर्च वाचतो, तणनाशक असल्यामुळे उत्पादनात वाढ होते, एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पन्न मिळते, असे पटवून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री सुरू आहे. बिटी बियाणे घेण्याचा शेतकऱ्यांचा कल असल्यामुळे फसवणूक होवून शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. ‘राशी ६५९’ कापसाच्या बियाणांवर शासनाने बंदी घातली असून या वाणात उगवण क्षमता कमी आहे.
दुकानांची तपासणी करण्याची मागणी
शेतकऱ्यांची दिशाभूल होवू नये, यासाठी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बोगस बियाणे काळाबाजारावर अंकुश लावणे गरजेचे आहे. जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट असताना कृषी विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. जिवती व कोरपना, राजुरा तालुक्यात बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात. मात्र अवैधरित्या सावकारी करणाऱ्या काही स्वयंघोषित सावकारांनी आतापासूनच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला सुरुवात केली आहे. वरोरा, भद्रावती, चिमूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कापूस व धानाची शेती केली जाते. त्यामुळे धान व कापूस बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांचा भर दिसून येतो.