भाजीपाल्याची चिल्लर विक्री होणार बंद!
By साईनाथ कुचनकार | Published: February 12, 2024 05:06 PM2024-02-12T17:06:26+5:302024-02-12T17:07:38+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आश्वासन; व्यावसायिकांचे आंदोलन मागे.
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील चिल्लर भाजीपाला विक्री बंद करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटनेने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन, तसेच भाजी विक्री बंदचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात सभापती, संचालकांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये ठोक बाजारामध्ये चिल्लर विक्री बंद करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीतून ठोक विक्रेते शहरातील गंजवॉर्ड, तसेच अन्य ठिकाणी भाजीपाला पुरवितात. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिल्लर भाजीपाला विकला जातो. परिणामी गंजवॉर्ड, तसेच शहरातील इतर बाजारामध्ये याचा परिणाम होत आहे. ग्राहक तिकडे फिरकत नसल्याने गंजवॉर्डातील भाजीपाला व्यावसायिकांची मोठी अडचण झाली आहे.
दरम्यान, महात्मा जोतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटनेने चिल्लर भाजीपाला विक्री बंद न केल्यास १२ फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला होता. या इशाऱ्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. यामध्ये एक महिन्याच्या आत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात चिल्लर भाजीपाला विक्री बंद करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.