तळोधीचे स्मशानघाट पाणी टंचाईच्या सावटाखाली
By admin | Published: April 30, 2016 12:59 AM2016-04-30T00:59:17+5:302016-04-30T00:59:17+5:30
पाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल
घनश्याम नवघडे नागभीड
पाणी टंचाईचा सामना केवळ गावांना नाही तर स्मशानघाटांनाही करावा लागत आहे. नाल्याजवळ असलेल्या स्मशानाना ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तळोधी येथे तर गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे.
तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे गाव असून येथे तळोधीच्या नावे एक आणि बाम्हणीच्या नावे एक असे दोन स्मशानघाट आहेत. हे दोन्ही स्मशानघाट जवळजवळ असून गावापासून दोन किलोमिटर अंतरावर बोकडडोह नाल्यावर आहेत. या दोन पैकी बाम्हणी स्मशानभूमीवर तळोधी ग्रामपंचायतीने एक विंधन विहिरीची व्यवस्था केली असली तरी या विंंधन विहीरीचा दांडा गेल्या अनेक दिवसांपासून तुटला असलञयाने ही विंधन विहीर बंद पडून आहे.
तळोधी स्मशानघाटावर विंधन विहिरीची व्यवस्था नसली तरी ग्रामपंचायतीने या ठिकाणी पाण्याची छोटी टाकी तयार करुन त्यावर नळकांडे लावले होते. पण हे नळकांडेसुद्धा अनेक दिवसांपासून बंद आहेत. तळोधी हे १५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. रोज येथे कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत असतो. त्यामुळे तळोधीवासियांना रोजच या स्मशानघाटावर जावे लागते.
हे स्मशानघाट बोकडडोह नाल्यावर असले तरी यावर्षी कमी पावसामुळे हा नाला कोरडा पडला आहे. त्यामुळे अंत्यविधी करणाऱ्या व अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची पाण्याविणा मोठीच परवड होत आहे. श्रीमंत व्यक्तीच्या घरचा अंत्यविधी असेल तर हे लोक पाण्याच्या कॅनची व्यवस्था करतात. पण गरीब व साधारण लोकांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
नाला कोरडा पडल्याने आणि बाम्हणी स्मशान घाटाची विंधन विहिर बंद असल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाला नाही तर अंत्यविधिनंतर करण्यात येणाऱ्या विधिसाठी सुद्धा जे पाणी आवश्यक असते त्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तळोधी ग्रामपंचायतीने केवळ सिमेंटचे रस्ते तयार करण्यात व्यस्त न राहता गेल्या दिड वर्षापासून बाम्हणी स्मशान घाटात बंद असलेल्या हातपंपाकडे व तळोधी स्मशानघाटावरील बंद नळकांड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्मशानभूमीतील जलस्रोतांची काळजी घेणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. पण या कर्तव्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशी परिस्थितीनिर्माण झाली.
- प्रा. उपेंद्र चिटमलवार, अध्यक्ष, तंमुस, तळोधी
याबद्दल तक्रारी आल्या आहेत. ग्रा.पं.च्या मार्फत ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न त्वरित केल्या जाईल.
- विलास लांजेवार, सदस्य ग्रा.पं. तळोधी