नागपूर विभागात आता 'समस्या तुमच्या, पुढाकार आमचा' उपक्रम
By साईनाथ कुचनकार | Published: April 26, 2023 04:15 PM2023-04-26T16:15:42+5:302023-04-26T16:20:51+5:30
शिक्षकांच्या समस्या सुटणार : प्रलंबित प्रकरणाचाही होणार निपटारा
चंद्रपूर : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील अनेक शिक्षकांच्या समस्या आहे. या समस्यांना घेऊन शिक्षक वारंवार जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिजवतात. मात्र वर्षानुवर्षे त्यांचा अर्ज, निवेदनाकडे अनेक वेळा बघितलेही जात नाही. शिक्षणाधिकाऱ्यांकडील अर्ज, निवेदनाचा त्वरित निपटारा व्हावा, शिक्षकांना त्रास होऊ नये यासाठी नागपूर विभागामध्ये आता 'समस्या तुमच्या, पुढाकार आमचा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आमदार सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून होणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागात अनेक समस्या, प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी नागपूर विभागातील जिल्हानिहाय हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती संबंधित शिक्षकांनी आमदारांच्या नावे अर्ज लिहून ३ मे २०२३ पर्यंत पाठवायची आहे. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक-एक समस्या निकाली काढण्यात येणार आहे. शिक्षकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन समस्या सोडवाव्यात, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले आहे.
नागपूर विभागातील काही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांचा निपटारा व्हावा, शिक्षकांच्या समस्या त्वरित सुटाव्या, त्यांना शासकीय दरबारी त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल.
- सुधाकर अडबाले, आमदार, नागपूर विभाग, शिक्षक मतदारसंघ