जिल्ह्यात एकाच दिवशी 369 बाधित झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:24+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख १५ हजार ३८९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी तब्बल ३६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १७५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख १५ हजार ३८९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
शनिवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष व घुग्घुस येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८० बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६०, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
दरम्यान, दिवाळी आटोपत आली आहे. तरीही नागरिकांची गर्दी कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघताना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
६४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
चंद्रपूर जिल्ह्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता केवळ एक हजार ९७६ रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. विशेष म्हणजे, यातील ६४१ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे नसतील किंवा सौम्य लक्षणे असतील अशा रुग्णांना डॉक्टरही घरात राहूनच उपचार करायला लावत आहे. मात्र त्यासाठी आरोग्य विभागाच्या अटींची पूर्तता करावी लागते.