१५ वर्षे वयाच्या झाडाचा असाही प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:01 PM2018-11-19T22:01:22+5:302018-11-19T22:01:34+5:30
झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे. तेलंगनातून दिल्लीला लागवडीकरिता निघालेल्या २२ फुट उंचीच्या झाडांचे वरोरा येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना झालेल्या दर्शनाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सदर झाडे अजस्त्र जातीची असून शहरातून जाताना ती सर्वांसाठी कुतुहूलाचा विषय ठरली होती.
वरोरा येथील उड्डाणपुल जवळील पथकर नाक्यावरून ट्रक (क़ एमएच-४० बीजीओ २६५) जात असताना त्यावर २२ फूट उंचीची झाडे ठेवलेली होती. जी सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरली होती. यामुळे बघ्यांची मोठी गर्दी तिथे उसळली होती. या संंदर्भात ट्रक चालक निला मोहम्मद यांच्याकडून माहिती घेतली असता तेलंगणातील जिल रंगा येथील युनिक ट्री प्रायव्हेट लिमिटेड या नर्सरी कंपनीतून घेतलेली ही झाडे ट्रकमधून दिल्लीकडे नेली जात असून या झाडांमध्ये फिगस बी रोपैसी हे २२ फुट उंचीचे अजस्र नावाचे झाड आणि दुसरे आलिव्ह मल्टी बॉल्स हे दहा फूट उंचीचे झाड असल्याचे सांगण्यात आले.
झांडाचे वय १२ ते १५ वर्षे असूनही ही झाडे दिल्ली येथील राजीव चोप्रा यांच्या बंगल्यातील प्रांगणात लावण्यासाठी नेली जात असल्याचे म्हटले जाते. सर्व झाडे दोन दिवसांच्या प्रवासानंतरही हिरवीगार दिसत होती. ती आणखी तीन दिवसांच्या प्रवासानंतर दिल्लीला पोहचणार आहे. झाडांची ही वाहतूक वृक्षतोड थांबविण्यासाठी आशेचे किरण ठरू शकणार आहे. रस्ते, औद्योगिक वसाहतीसह अन्य विकास कामे केली जाताना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाते. परंतु, अशा विकसित तंत्रज्ञानामुळे तोडावी लागणारी झाडे व्यवस्थितपणे उपडून सुरक्षित ठिकाणी त्यांची लागवड करणे आता शक्य होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आता शासनाने त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.