संभाजी ब्रिगेटचे एसडीओंना निवेदन
By admin | Published: June 29, 2016 01:10 AM2016-06-29T01:10:06+5:302016-06-29T01:10:06+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शालेय प्रवेशासाठी व इतर शासकीय कामांसाठी विविध दस्ताऐवजाची व प्राणपत्राची आवश्यकता असते.
ब्रह्मपुरी : विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शालेय प्रवेशासाठी व इतर शासकीय कामांसाठी विविध दस्ताऐवजाची व प्राणपत्राची आवश्यकता असते. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्याच विद्यालय व महाविद्यालयात आवश्यक प्रमाणपत्र व दाखले मिळवून देण्याची व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीने पाठविले आहे.
विद्यालयात तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय व अधिवास दाखला आदी प्रमाणपत्राची गरज भासते. त्यासाठी बऱ्याचशा ग्रामीण विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतो. त्यातही दलालांकडून आर्थिक लूट होते.
अशा विविध त्रासांपासून विद्यार्थी व पालकांची सुटका करण्यासाठी प्रत्येक विद्यालय तथा महाविद्यालयात शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे मार्गदर्शन करुन शिबिर आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करताना होणारा त्रास कमी होईल. यावेळी राजस्व अभियानही राबवावे असे संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीने म्हटले आहे.
उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष महेश पिलारे, तालुका उपाध्यक्ष अंकुश मातेरे, गोवर्धन दोनाडकर, सचिव आशिष नागदेवते, कार्याध्यक्ष दीपक ढोरे, अ. वि. सहारे, विक्की कसार, मिथुन चौधरी, बंटी गोंडाने, रामू मेश्राम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)