गोंडपिपरी तालुक्यात ३९ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:28+5:302021-03-21T04:26:28+5:30
गोंडपिपरी : संपूर्ण जग होरपळून टाकणाऱ्या कोरोना संकटापुढे महाविकास आघाडीच्या सरकारने तटस्थ राहून लढा दिला व नागरिकांना कोरोना ...
गोंडपिपरी : संपूर्ण जग होरपळून टाकणाऱ्या कोरोना संकटापुढे महाविकास आघाडीच्या सरकारने तटस्थ राहून लढा दिला व नागरिकांना कोरोना संकटात सुविधा पुरविल्या. अशा बिकट परिस्थितीतही क्षेत्रातील विकासकामांना ब्रेक लागू दिला नाही, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गोंडपिपरी तालुक्यात ३९ कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आ. धोटे बोलत होते. या वेळी राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, कृउबा समिती सभापती सुरेश चौधरी, उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, गोंडपिपरी तहसीलदार के.डी. मेश्राम, नगरपंचायत मुख्याधिकारी विशाखा शेळकी, माजी नगराध्यक्ष सपना साकलवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष बंडावार प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी आमदार सुभाष धोटे यांनी शासनस्तरावर परिश्रम घेऊन गोंडपिपरी शहरासाठी अडीच कोटींचा विकास निधी खेचून आणल्याचे सांगितले. यात गोंडपिपरी नगरपंचायतला प्रशासकीय इमारतीसाठी १.४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला तर अंतर्गत रस्त्यासाठी एक कोटी व आगामी काळात ३.६६ कोटी रुपयांच्या निधीची कामे असा आजवर सात कोटींचा व उर्वरित तालुक्यात आठ कोटी असे एकूण ३८ कोटी ८० लाख रुपयांच्या विकास निधीची मंजुरी मिळवून दिल्याची माहिती त्यांनी दिली.