गोंडपिपरीतील शिवाजी चौक बनला वाळू माफियांचा अड्डा
By admin | Published: July 12, 2014 01:07 AM2014-07-12T01:07:22+5:302014-07-12T01:07:22+5:30
खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे.
चंद्रपूर : खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने दररोज शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. या तस्करांनी गोंडपिपरीतील शिवाजी चौकाला आपला अड्डा बनविले असून येथूनच वाळू तस्करीचे नियोजन केले जात आहे. प्रशासनाच्या कारवाईला दिरंगाई होत असल्याने वाळू माफियांचे फावत असून दिवसागणिक वाळूच्या तस्करीला पाठबळ मिळत असल्याचेही बोलल्या जात आहे.
गोंडपिपरी तालुका उद्योगविरहित असल्याने तालुक्यात वाळूची मागणी कमी आहे. परंतु तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांतील वाळू चांगल्या दर्जाची असल्याने राजुरा, गडचांदूर, कोरपना, चंद्रपूर, बल्लारपूर शहरातून वारंवार वाळूची मागणी होत असल्याने गोंडपिपरी तालुक्यातील वाळू तस्कर कर्मचाऱ्यांना चिरमिरी देऊन वाळू तस्करीचा धंदा करीत आहेत. तालुक्यातील राजकारणी, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या धंद्यात गुंतले असल्याची चर्चा असून दररोज लाखो रुपयांची वाळू चोरीला जात आहे.
गोंडपिपरी येथील शिवाजी चौक वाळू माफियांचा अड्डा बनले आहे. या चौकातील टपऱ्यावर बसून वाळू तस्करीचे नियोजन केल्या जात आहे. वाळू तस्करीसाठी वढोली, खरारपेठ मार्गाचा उपयोग केला जात असून मार्गालगतच जंगलाचा भाग विस्तारला आहे. त्यात अनेक वन्यप्राण्यांचा वावर असून त्यांच्या जिवाला यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या मार्गावर शिकारीचे प्रमाण वाढले आहे. वाळू तस्करीला गेलेल्या गाड्या जंगलात उभ्या करून गाडीच्या लाईटाच्या साहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करीत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते रूजू होताच, वाळू तस्करीला आळा बसला होता. परंतु त्यांच्याकडे चंद्रपूर निवासी जिल्हाधिकाऱ्याचा प्रभार देण्यात आला असल्याने वाळू माफियांचे फावत असून रोज शेकडो ब्रास वाळू लंपास केली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. (प्रतिनिधी)