रेती तस्कर दंडच भरेनात, लिलावातून करणार वसुली; महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर
By साईनाथ कुचनकार | Published: February 25, 2024 08:39 PM2024-02-25T20:39:33+5:302024-02-25T20:40:09+5:30
... यातून चंद्रपूर तालुका प्रशासन २ कोटी १ लाख १ हजार ६५२ रुपयांचा महसूल वसूल करणार आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही. त्यातच शासकीय डेपोसुद्धा सुरू झाले नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. या तस्करीतील अनेक वाहने चंद्रपूर तहसील प्रशासनाने जप्त केली आहेत. मात्र संबंधित वाहनांचे मालक दंडाची रक्कम भरत नसल्याने आता कठोर पाऊल उचलत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून चंद्रपूर तालुका प्रशासन २ कोटी १ लाख १ हजार ६५२ रुपयांचा महसूल वसूल करणार आहे.
चंद्रपूर तालुका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये रेती तस्करीप्रकरणी अनेक वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहन मालकांनी दंड भरून आपले वाहन प्रशासनाकडून सोडवून नेले. मात्र अजूनही ९८ वाहन मालकांनी दंड भरलाच नसल्याने त्यांचे वाहन जप्त करून ठेवण्यात आले आहे. मात्र आता वाहन जप्त केल्याची मुदत संपत असल्याने तहसील प्रशासनाने या वाहनांचा लिलाव करून महसूल वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित वाहन चालकांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता या जप्त वाहनातून २ कोटी १ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात येणार आहे.
जप्त केलेल्या वाहनांची संख्या
ट्रॅक्टर ५८
हायवा १४
हापटन ११
तीनचाकी ऑटो ५
ट्रक ४
जेसीबी १
तस्करही लई भारी
रेती तस्करीसाठी अनेकवेळा जुन्या वाहनांचा वापर केला जातो. विशेषत: नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचा या तस्करीसाठी अनेकवेळा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्यावेळी प्रशासनाने वाहन जप्त केले तरी वाहन मालकांचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे अनेकवेळा जप्त केलेले वाहन सोडविण्याच्या भानगडीत वाहन मालक पडत नाही. तर काहीवेळा प्रशासनाला न घाबरताही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जाते.
रेती तस्करीप्रकरणी चंद्रपूर तालुका प्रशासनाने अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. मात्र संबंधित वाहन मालक दंड भरत नसल्याने हा दंड वसूल करण्यासाठी आता जप्त वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. यासंदर्भात संबंधित वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
-विजय पवार, तहसीलदार, चंद्रपूर