संत रामराव महाराज याचे विचार आणि कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:08+5:302021-04-05T04:25:08+5:30
सुभाष धोटे : शेवगाव येथे संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण जिवती : बंजारा समाजाचे थोर संत रामराव बापू ...
सुभाष धोटे : शेवगाव येथे संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
जिवती : बंजारा समाजाचे थोर संत रामराव बापू महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचे विचार-कार्य याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम त्यांनी आजन्म केले. बंजारा समाजाला नवी दिशा आणि बळ देण्याचे काम त्यांनी केले. बंजारा समाजामध्ये रामराव बापू यांचा शब्द अंतिम असे. बंजारा समाजाबरोबरच इतर धर्मीयांमध्येही रामराव बापू यांचे एक आदराचे स्थान आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
जिवती तालुक्यातील शेवगाव येथे संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. धोटे म्हणाले, महाराजांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. केंद्र सरकारने रामराव बापू यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वी संतास समस्त भक्तगण मुकले आहेत. त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य जगाच्या कल्याणासाठी सदैव प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार संजय धोटे, सद्गुरू प्रेमसिंग महाराज, नगराध्यक्ष अरुण धोटे, मोतीलाल महाराज या सर्वांच्या हस्ते डॉ. रामराव बापू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी सुरेश केंद्रे, गोदावरी केंद्रे ताजुदीन शेख, प्रेमदास राठोड, प्रलाद राठोड, शंकर नाईक, बापुलाल महाराज, भिमराव पवार, देविदास साबणे, शबीर पठाण, आनंद राठोड उपस्थित होते.