संततधार : जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 11:23 PM2018-07-06T23:23:44+5:302018-07-06T23:26:37+5:30
पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात पावसाची झड लागली आहे. २४ तासांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन जण पुरात वाहून गेले तर पुरात अडकलेल्या दहा जणांची सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने काही मार्ग शुक्रवारी दुपारनंतर बंद झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात पावसाची झड लागली आहे. २४ तासांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन जण पुरात वाहून गेले तर पुरात अडकलेल्या दहा जणांची सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने काही मार्ग शुक्रवारी दुपारनंतर बंद झाले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. राजुरा तालुक्यात सुमारे २५ घरांची पडझड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही दमदार स्वरुपाचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन-तीन दिवसांच्या झडीची प्रतीक्षा होती. अशातच गुरुवारी रात्री ८ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर आज शुक्रवारीही जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस बरसत राहिला. यामुळे नदी-नाल्यांमधील जलस्तर वाढला. अनेक मार्ग बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपुरातील दाताळा मार्गावरील पुलाजवळ पाणी आल्याने नदीच्या त्या भागातील शाळांना लवकरच सुटी देण्यात आली. चंद्रपुरातील अनेक नाल्यांमधील पाणी थोपून रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
पाण्याने नदी, नाले भरले
गोवरी : राजुरा तालुक्यासह जिल्हाभरात पावसाचा दमदार एन्टीने शेतकºयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पाऊस असाच संततधार सुरू राहिला तर नदीकाठावरील गावांना पुराचा धोका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजुरा तालुक्यात गुरूवार मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तब्बल बारा तास उलटून गेले तरी पाऊस सारखा पडत असल्याने पुरस्थिती होण्याची शक्यता आहे. पावसामुळे राजुरा तालुक्यातील नदी-नाले तुडूंब भरले आहे. दरम्यान, सर्पदंशाने एका वासराचाही मृत्यू झाला. गोवरी येथे एका गोठ्याची भिंत कोसळली. शेतातील पिके जलमय झाली आहेत.
कोळसा उत्पादन ठप्प
घुग्घुस : गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रा.पच्या चुकीच्या नियोजनामुळे नाल्या तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आले. वस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान, वेकोलि वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतील डिस्पॅच वगळता सर्व कोळसा खाणीचे उत्पादन ठप्प झाले आहे.
पाच तालुक्यात अविवृष्टी
जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि चिमूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत भद्रावती तालुक्यात १०५.०२ मिमी, बल्लारपूर-१३२ मिमी, चंद्रपूर-७१.५ मिमी, चिमूर-१३७ मिमी, ब्रह्मपुरी-११० मिमी पाऊस पडला. मागील २४ तासात जिल्ह्यात एकूण ६४२.६ मिमी पाऊस बरसला. म्हणजे सरासरी ४२.८४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
१५५ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले
कोरपना तालुक्यातील वडगाव जि.प. शाळेतील १५५ विद्यार्थी नाल्यावरील पुरामुळे अडकले होते. गावकºयांना त्यांना मनुष्यसाखळी तयार करून सुखरुप बाहेर काढले. सोनुर्ली ते पाकडहिरा रस्त्यावरील रपटाही तुटला. त्यामुळे मार्ग बंद झाला.
बल्लारपूर-चंद्रपूर मार्ग बंद
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात सर्वत्रच गुरुवारपासून पाऊस बरसत आहे. यामुळे तळ्याबोड्यात पाणी जमा झाले व शेतशिवार पाण्याने संपूर्ण माखला गेला आहे. नाले तुडुंंब वाहू लागले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भिवकुंड नाल्यावरून पाणी वाहत असल्याने चंद्रपूर-बल्लारपूर मार्ग बंद झाला होता.
खांबाडा येथे दहा कामगारांची सुटका
वरोरा तालुक्यातील राजनांदगाव ते नागरी मार्गावर महावितरणचे ७६५ के.व्ही.चे काम सुरू आहे. शुक्रवारी याठिकाणी ११ कामगार काम करीत होते. ते ज्या ठिकाणी काम करीत होते. तिथेच पोथरा नदी आहे. संततधार पावसामुळे अचानक पोथरा नदीला पुर आला. जिथे काम सुरू होते, तिथे पाणी येऊ लागल्याने या कामावरील अकराही मजूर झाडावर चढले. याची माहिती वरोरा पोलीस व तहसीलदारांना देण्यात आली. वरोरा पोलीस व प्रशासनाच्या वतीने तत्काळ बोट व रुग्णवाहिका त्या ठिकाणी पाठविण्यात आली. यातील दहा जणांना वाचविण्यात आले. मात्र एक कर्मचारी बेपत्ता आहे. मोहनलाल मांडली असे सदर कामगाराचे नाव आहे. वरोराचे आमदार बाळू धानोरकर यांंनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळाला भेट दिली.
ब्रम्हपुरी तालुक्यात आठ घरांची पडझड
ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यात गुरूवारी रात्री पाउस दमदार पावसाने हजेरी लावत शुक्रवारच्या सकाळपर्यंत उसंत घेतली नाही. त्यानंतर दिवसभरही पाऊस सुरूच राहिला. या संततधार पावसाने खेड येथील दोन, ब्रम्हपुरी येथील चार, रानबोथली येथील एक व पारडगाव येथील एक, अशा एकूण आठ घरांची पडझड झाली.
चिमूरहून निघालेली बस पाण्यात अडकली
चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी चिमूर आगाराची बस बोथली जवळच्या पुलावर रस्त्याखाली उतरली व पाण्यात गेली. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. आता काय होणार म्हणून प्रवाशी घाबरले. मात्र बसचालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली नाही. माजरी परिसरातील शिरणा नदीला पूर आल्याने माजरी-भद्रावती, माजरी-पळसगाव व कुचना मार्ग बंद झाले आहेत. राळेगाव येथील पूल खचल्याने वरोरा-चिमूर मार्गही बंद झाला आहे.
वैनगंगा नदीत इसम वाहून गेला
घोसरी : पोभूंर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील शेतकरी विनोद भाऊजी बोडेकर (३४) व अन्य तीन जण शुक्रवारी दुपारी १ वाजता वैनंगगा नदीच्या काठावरून मोटारपंपचे पाईप काढत असताना अचानक नदीचे पाणी वाढले. पाण्यामध्ये चौघेही वाहून गेले. त्यातील तीन जण पोहता येत असल्याने कसेबसे बाहेर आले. मात्र विनोद बोडेकर हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. याची माहिती तत्काळ गावकºयांना देण्यात आली. गावकºयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. विनोदचा शोध लागला नाही.