संतोषसिंह रावत हल्ला प्रकरण : काँग्रेस समर्थित दोन सख्या भावंडांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:51 PM2023-05-24T12:51:35+5:302023-05-24T12:52:10+5:30

नायकांनी गोळीबार प्रकरणावरील पडदा हटवला

Santosh Singh Rawat attack case: Two siblings supported by Congress arrested | संतोषसिंह रावत हल्ला प्रकरण : काँग्रेस समर्थित दोन सख्या भावंडांना अटक

संतोषसिंह रावत हल्ला प्रकरण : काँग्रेस समर्थित दोन सख्या भावंडांना अटक

googlenewsNext

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात गाजत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तब्बल १२ दिवसांनंतर आरोपींना अटक करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे काँग्रेसचे असल्याचे पुढे आले असून दोन सख्या भावडांना अटक केली आहे. राजवीर कुंवरलाल यादव (३६), अमर कुंवरलाल यादव (२९) रा. आझाद चौक, बाबूपेठ, चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संतोषसिंह रावत यांनी वेकोलिमध्ये नोकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, अडीच वर्षांचा कालावधी होऊनही नोकरी लावून दिली नाही. अन् पैसेही परत दिले नाहीत. या सख्या भावडांनी संतोष सिंह रावत यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्री ९:१९ वाजता मूल मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयातून स्कूटीने घरी जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी १६ पथके गठित केली होती. यामुळे पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह लागले होते. पोलिसांचा तिसरा डोळा असलेली स्थानिक गुन्हे शाखाही यात सपशेल नापास झाली.

पोलिस अधीक्षकांनी अखेर तब्बल दहा दिवसांनंतर याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्याकडे सोपविली. नायक यांनी लगेच सूत्रे हलवून अवघ्या काही तासांतच राजवीर यादव, अमर यादव या दोघांना बाबूपेठ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात यश मिळविले. यानंतर आरोपींची झाडाझडती घेतली. यानंतर आरोपींनी तोंड उघडले. यामध्ये संतोष सिंह रावत यांनी वेकोलित नोकरी लावून देतो म्हणून यादव यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते; परंतु अडीच वर्षांचा कालावधी होऊनही नोकरी लावून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. या रागातूनच रावत यांच्यावर गोळीबार केला, अशी कबुली आराेपींनी दिली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, रावत हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. वेकोलिच्या नोकरीशी त्यांचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करून आरोपींची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांना आरोपींना अटक करण्यासाठी अल्टिमेटम देणारे काँग्रेस नेता माजीमंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याचाही छडा पोलिस लावतील, असे बोलले जात आहे.

गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची ओळख पटली

संतोष सिंह रावत यांच्यावर चारचाकी वाहनातून आलेल्यांनी गोळीबार केला होता. ते वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्या वाहनाची ओळख पटली असून ते वाहन लवकरच जप्त करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षाचा वेकोलिशी काय संबंध ?

वेकोलित नोकरी लावून देण्यासाठी संतोष सिंह रावत यांनी आरोपींकडून पैसे घेतले. परंतु नोकरीही लावून दिली नाही व पैसेही परत दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत यांचा वेकोलिशी काय संबंध, असा प्रश्न निर्माण होत आहे. याचा छडा पोलिस लावतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Santosh Singh Rawat attack case: Two siblings supported by Congress arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.