आनंदवनातील स्वरानंदवन आॅर्केस्ट्राची बस उभ्या टिप्परवर धडकलीे; डॉ. विकास आमटे यांचे सहकारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 09:35 AM2017-12-18T09:35:16+5:302017-12-18T09:38:41+5:30
मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. सोबतच बसमधील ४१ कलावंत किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
पुरुषोत्तम नांदेकर (४८), मेघराज भोयर (३७) व अक्षय राऊत अशी गंभीर जखमींची नावे आहेत. मूर्तीजापूर येथे प्रशांत चहाणकर यांनी आनंदवनातील स्वरानंदवन आर्केस्ट्राचे आयोजन केले होते. आनंदवनातील सर्व कलावंत कार्यक्रम आटोपून परत आनंदवनाकडे निघाले. जाम येथे चहा घेऊन कलावंतांची बस (क्रमांक एमएच ३४ ए ८२३८) आनंदवनकडे जात असताना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील रामपूर गावाजवळ उभ्या असलेल्या टिप्परला (क्रमांक सीजी ०७ ई ८८१४) बसची धडक बसली. यात बाळू माटेसह बसमधील कलावंत जखमी झाले. बाळू माटे यांना उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम नांदेकर, अक्षय राऊत व मेघराज भोयर यांच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य कलावंत किरकोळ जखमी आहेत.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून आनंदवनाला पाठविण्यात आले आहे.