यांत्रिकीकरणात हरवली सर्जा-राजाची जोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:41+5:30
पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्षभर खांद्यावर भार वाहणाऱ्या बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा करतो. पण नापिकी, ओला दुष्काळ यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबतच २१ व्या शतकात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परिणामी सर्जा राज्याची जोडी कमी झाल्याचे दिसत आहे.
पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो, त्याच्या शिंगाला बाशिंग तर अंगावर विशिष्ट आकाराचा झूल टाकून त्याला सजवतो. त्यानंतर वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढतो. गावातील मंदिराला प्रदक्षिणा घालून त्याचे ओक्षण करून पुरणपोळी खायला घालतो. यावेळी परिसरातील नागरिकही पूजा करतात. परंतु नापिकीमुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न परिणामी बैल पोसणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. तसेच यांत्रिकीकरणाची अनेक साधने तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी सर्जा-राजाची जोडी आता कमी होत आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही या जोडीनेच शेती केली जात आहे.
गुराखीच मिळेना !
पूर्वी जनावरे राखण्यासाठी मोठया प्रमाणात गुराखी मिळत असत. त्यांना शेतकरी पीक निघाल्यानंतर धान्य देत असत. मात्र आता त्यावर भागत नसल्याने जनावरे जंगलात चराईसाठी नेण्यासाठी गुराखीच मिळत नाही. परिणामी जनावरे चाराईसाठी नेण्याचा मोठा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.
दुधाळ जनावरांकडे कल
पूर्वी शेतकऱ्याकडे मोठया प्रमाणात जनावरे होती. जनावरांच्या संख्येवरून शेतकऱ्याची श्रीमंती ठरवली जायची. लग्न कार्य ठरवताना किती जनावरे आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र आता वैरणाचा प्रश्न, चाऱ्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती यामुळे शेतकऱ्यांना जनावरे पोसणे कठीण झाले आहे. याउलट दूधाळू जनावरामुळे दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ जसे पनीर यासारखे विकायला मिळत असल्याने दूधाळू म्हणजेच गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे पालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.