वनमजूर बनला मारोडा गावचा सरपंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:55+5:302021-02-08T04:24:55+5:30

राजू गेडाम मूल : वनविभागात वनमजूर म्हणून अनवाणी पायाने तो जंगलात फिरून वन्यजीव व वृक्षसंवर्धनाचे काम करणारा भिकारू शेंडे ...

Sarpanch of Maroda village became a forest laborer! | वनमजूर बनला मारोडा गावचा सरपंच!

वनमजूर बनला मारोडा गावचा सरपंच!

Next

राजू गेडाम

मूल :

वनविभागात वनमजूर म्हणून अनवाणी पायाने तो जंगलात फिरून वन्यजीव व वृक्षसंवर्धनाचे काम करणारा भिकारू शेंडे हा मारोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीत विजयी होऊन सरपंचपदी विराजमान झाला आहे.

माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा. कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून मारोडा गावाची ओळख आहे. मूल तालुक्यातील मारोडा गावातील रहिवासी असलेल्या भिकारू शेंडे हा वनविभागात वनमजूर म्हणून कामावर होता. मारोडा हे बफर झोनमध्ये असल्याने येथील जंगलात रानटी श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. असे असताना भिकारू शेंडे हा अनवाणी पायाने जंगलात फिरायचा. त्यामुळे अनवाणी पायाने फिरण्याची त्याला सवयच जडली. ही अनवाणी पायाने चालण्याची सवय त्याला वनविभागात होणाऱ्या चालण्याच्या स्पर्धेत मोलाची ठरली. वनविभागाने राज्य, आंतरराज्यीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात या राज्यांतही पुरस्कार मिळविले. त्यामुळे चंद्रपूर वनविभागाचे नाव विविध राज्यांतदेखील चमकले. त्यामुळे भिकारू हा वनमजूर जरी असला, तरी अधिकारीवर्ग त्याला आदरयुक्त वागणूक देत होते. घनदाट अशा जंगलात जिथे वन्य प्राण्यांचा वावर आहे, तिथे वन्यजीव व वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी त्याची सतत धावपळ असल्याने समाजाप्रति असलेली कृतज्ञता दिसून येते. वयाच्या ५८ व्या वर्षी वनविभागातून सेवानिवृत्त झाल्यावर समाजसेवा नियमित सुरू ठेवली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तो विजयी झाला. सरपंचपद सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने समाजसेवेसाठी आपणही गाव विकासाला हातभार लावावा, यासाठी सरपंच होण्यास तयार झाला. वनविभागात केलेल्या कामाची पावती बघता कुणीही विरोध केला नाही. क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा माजी अर्थ व नियोजनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा संमती दिल्याने भिकारू शेंडे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. वनमजूर ते सरपंच हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

Web Title: Sarpanch of Maroda village became a forest laborer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.