सरपंचांची डोकेदुखी वाढणार

By admin | Published: September 14, 2016 12:44 AM2016-09-14T00:44:02+5:302016-09-14T00:44:02+5:30

राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र योजना राज्यात लागू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०३ ग्रामपंचायतीमध्ये ही योजना स्वीकारण्याची तयारी झाली आहे.

Sarpanch's headache will increase | सरपंचांची डोकेदुखी वाढणार

सरपंचांची डोकेदुखी वाढणार

Next

चंद्रपूर : राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र योजना राज्यात लागू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०३ ग्रामपंचायतीमध्ये ही योजना स्वीकारण्याची तयारी झाली आहे. या योजनेत ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचा निकष ठरविण्यात आला आहे. मात्र, निकषापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतचे क्लस्टर तयार करून त्या सर्व ग्रामपंचायतमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे. या योजनेत नागरिकांना लाभ मिळणार असला तरी क्लस्टरमध्ये एकत्र येणाऱ्या इतर ग्रामपंचायतच्या सरपंचांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायती क्लस्टरमध्ये सहभागी होण्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी ई-पंचायतअंतर्गत ‘संग्राम’ प्रकल्प २०११ ते २०१५ या कालावधीत राबविण्यात आला. त्याची अंमलबजावणी महाआॅनलाईन कंपनीने केली. त्यावेळी त्या कंपनीने ग्रामपंचायत पातळीवर आपली यंत्रणा उभारली होती. आता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, पंचायतराज संस्थांगमध्ये ई-पंचायत प्रकल्प राबविण्याचा पुढील टप्पा म्हणून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगामध्ये त्याकरिता तरतूद केली जात आहे. याकरिता १५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात येत आहे. त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींनी आपले सरकार सेवा केंद्रात सहभागी होण्यासाठी ठराव घेऊन तो जिल्हा परिषदेला पाठवायचा आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न फारच कमी आहे, त्यांचे क्लस्टर तयार करण्याच्या सूचना आहेत. त्या क्लस्टरमध्ये आपले सरकार सेवा केंद्र एका ग्रामपंचायतमध्ये राहील. उर्वरित ग्रामपंचायतमधील नागरिकांना त्या सेवा केंद्रातून सर्व प्रकारचे दाखले आणि व्यवहार करता येतील. मात्र, त्यांच्या दाखल्यांवर सेवा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच स्वाक्षरी करणार नाहीत. त्या दाखल्यावर नागरिकांच्या ग्रामपंचायत सरपंचांना स्वाक्षरी करायची आहे. क्लस्टर पद्धतीमध्ये ग्रामपंचायती एका केंद्राअंतर्गत आपली सेवा देणार आहे. त्याकरिता उर्वरित ग्रामपंचायतच्या नागरिकांना सेवा केंद्र असलेल्या गावाला जाऊन दाखले घ्यावे लागतील. याशिवाय बँकिंग व्यवहार किंवा इतर व्यवहारदेखील तेथे जाऊनच करावे लागतील. (प्रतिनिधी)

संगणक परिचालक होणार बेरोजगार
सुशी दाबगाव : आपले सरकार सेवा केंद्राची योजना राबविण्याकरिता १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतच्या इच्छेनुसार क्लस्टर (गट) तयार केला जाणार आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात एका गावात केंद्र ठेवून इतर ग्रामपंचायतींना सहभागी केले जात असल्याने त्या ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचा रोजगार बाद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कार्यरत संगणक परिचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामसभेत ठराव घेऊनच १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीचे क्लस्टर तयार करणे आवश्यक आहे. परंतु गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त सूचनेनुसार, क्लस्टर निर्मिती सुरू करण्यात येत आहे. या क्लस्टरमध्ये इतर ग्रामपंचायती जोडण्यात आल्यास तेथे कार्यरत संगणक परिचालकांना कायमचे घरी बसावे लागेल. नवीन आपले सरकार सेवा केंद्राचा करार शासनाने दुसऱ्या कंपनीशी केला आहे.

Web Title: Sarpanch's headache will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.