"वाचवा वाचवा ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा", इको-प्रोचे आंदोलन
By साईनाथ कुचनकार | Published: December 7, 2023 04:59 PM2023-12-07T16:59:50+5:302023-12-07T17:01:16+5:30
हे आंदोलन इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.
चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनानिमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘एक दिवस एक आंदोलन’ या आंदोलनाच्या साखळीची सुरूवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरूवात करण्याची मागणी केली आहे. हे आंदोलन इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.
रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून, शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छी नाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्निया, भूजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतचे जलस्रोत प्रदूषित होत आहेत. तलावाच्या घाण पाण्याची दुर्गंधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत.
रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी यापूर्वी इको-प्रोने सत्याग्रह-आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केवळ खोलीकरण केले. मात्र, सांडपाणीमुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव आजही प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्य शासनासह प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘‘एसटीपी’चे बांधकाम, रिटेनिंग वॉलचे बांधकाम त्वरित पूर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरांतील तलावांची दुरवस्था झाली आहे. सर्व तलाव प्रदूषणमुक्त, सांडपाणीमुक्त करत त्यांचे पर्यावरणीयदृष्टया महत्त्व जाणून संवर्धन करणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदूषणमुक्त योजना’ राबविणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. राज्यातील शहरा-शहरांतील तलावांच्या स्वरूपातील नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा नष्ट होण्यापासून वाचविणे आवश्यक आहे.
- बंडू धोतरे
अध्यक्ष, इको-प्रो चंद्रपूर