पुराच्या पाण्यापासून गावाला वाचवा हो, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या पुरग्रस्त गावातील महिला
By साईनाथ कुचनकार | Published: June 20, 2023 03:31 PM2023-06-20T15:31:44+5:302023-06-20T15:32:45+5:30
विविध मागण्यांचे निवेदन
चंद्रपूर : वेकोलीने नदीपात्रालगत उभारलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या राखेमुळे शेती नापिक झाली आहे. शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने दिली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. केवळ आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तरी पुराच्या पाण्यापासून गावाचा वाचवा, या मागणीसाठी भद्रावती तालुक्यातील पिपरी दे. येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले.
नदीकाठावर वेकोलीने मोठमोठे मातीचे ढिगारे उभारले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरते. मागील वर्षी पुरामध्ये गावातील दोघांचा जीव गेला. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. जनावरांचा चारासुद्धा खराब झाला होता. यानंतर शासन, प्रशासन जागे झाले आणि गावात दौरे केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत कायम उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
वर्ष उलटले मात्र अजूनही काहीही उपाययोजना झाल्या नाही. उलट मातीचे ढिगारे वाढतच आहे. ग्रामस्थांनी आजपर्यंत प्रशासनाला अनेक निवेदन दिले. मात्र न्याय मिळालाच नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच संदीप खुटेमाटे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.