वाघ वाचवा जंगल वाचवा रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:48 AM2017-01-15T00:48:06+5:302017-01-15T00:48:06+5:30
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सायकल रॅली शुक्रवारी सकाळी १२ वाजता काढण्यात आली.
चंद्रपूर : संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित सायकल रॅली शुक्रवारी सकाळी १२ वाजता काढण्यात आली.
सायकल चालक दर्शन झाडे हे नागपूर रेल्वे पोलीसचे जवान असून त्यांना वन्यजीव, जंगल, पर्यावरणाची आवड असल्यामुळे ते या रॅलीत सहभागी झाले. संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेमार्फत ‘वाघ वाचवा जंगल वाचवा’ पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे व डॉ.गोपाल मुंधडा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी गिरीश बेले, रत्नमाला बावणे, शैलेश जुमडे, शितल इटनकर, राजेंद्र रघाताटे, रवी लोणकर, रोशन टिपले, अंजली घोटेकर, उज्वला येरणे यांची उपस्थिती होती.
रॅली चंद्रपूर ते दिल्ली या मार्गाने जाणार आहे. चंद्रपूर, जाम, छिंदवाडा, नरसिंगपूर, सागर, ललीतपूर, झांसी, ग्वालियर, आग्रा, मथुरा या मार्गाने नवी दिल्लीला २६ जानेवारी २०१७ रोजी लाल किल्ल्यावर पोहोचेल. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील वायू प्रदूषण, केमिकल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्रदुषणामुळे होणारे आजार व जिल्ह्यातील जंगल कटाई, वाघाचे मृत्यु यावर उपाययोजना करण्याकरिता सायकल चालक दर्शन झाडे व त्यांच्यासोबत असलेले सहकारी पवन खनके, सागर कातकर, कृणाल कामडी हे निवेदन सादर करतील. निवेदन देऊन नवी दिल्ली ते चंद्रपूर तब्बल २६०० किलोमीटर सायकल प्रवास करून झाडे व त्यांचे सहयोगी पवन खनके, सागर कातकर, कृणाल कामडी हे जटपुरा गेट येथे येऊन सायकल रॅलीचा समारोप करतील. (शहर प्रतिनिधी)