बचत गटांची अडीच लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:14 PM2019-01-12T22:14:09+5:302019-01-12T22:14:32+5:30
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा. याठिकाणी बचत गटांच्या वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकऱ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या सरस विक्री प्रदर्शनामध्ये पहिल्याच दिवशी दोन लाख ५३ हजार एवढी भरघोस विक्री झाली आहे. त्यात नागभीड तालुक्यातील झेप प्रभाग संघाने उत्पादित केलेल्या विविध वस्तू, मोठ्या प्रमाणात विक्री झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूह आणि उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, बचत गटांच्या महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित वस्तूंची भव्य विक्री प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित केले आहे. या विक्री प्रदर्शनीमध्ये स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या सुगंधित अगरबत्ती, घोंगडी व गाद्या कापडी बॅग, लोकर विणकाम, विविध प्रकारच्या मातीच्या शोभेच्या वस्तू व भांडी, लाकडी शोभेच्या वस्तू, बांबू हस्तकला विविध प्रकारचे लोणचे, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित वस्तू, झुणका-भाकर ते विविध शाकाहारी,मांसाहारी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. विविध नाश्त्याचे प्रकार सेंद्रीय शेतीतील आवश्यक असलेले सेंद्रिय खत, बीजामृत, जीवामृत, द्राक्षासव पशुपालनासाठी आवश्यक असणाºया बाबींसह या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या पशुंचे देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील महालक्ष्मी समूहाने मच्छी पासून तयार केलेले लोणचे, चकली पापड, चिमूर तालुक्यातील शारदा स्वयंसहाय्यता समूहाने सौंदर्यप्रसाधने तयार केली आहेत. त्यांचीही भरपूर विक्री होत आहे. तसेच फुड स्टॉलवरील अनेक स्टॉलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.
या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत वाघमारे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा डॉ.उदय पाटील यांनी संयुक्तरित्या जारी केलेल्या पत्रकामधून केले आहे.