सावित्रीबाई फुले जयंती आता महिला शिक्षण दिन म्हणून होणार साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:19+5:302021-01-03T04:29:19+5:30
सावली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ...
सावली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २४ डिसेंबरला घेतला आहे.
थोर समाज सुधारक शिक्षक तज्ज्ञ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयात महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, सर्व शाळा महाविद्यालयात, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे, प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांचा गट करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चर्चासत्रे, ऑनलाईन सेमिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व, त्यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवादाचे आयोजन करणे, महिला शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे स्त्री शिक्षणातील महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा गौरव करणे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटकावर आधारित पथनाट्य, एकपात्री प्रयोग याचे आयोजन करणे, त्यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमाच्या इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, परिसंवाद, एकांकिका यासारखे उपक्रम राबविण्यात यावे. तसेच या कार्यक्रमाची सर्व समाज माध्यमात प्रसिद्धी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.