शिक्षणासाठी सावित्रीच्या लेकींचा पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:25 PM2018-09-17T22:25:51+5:302018-09-17T22:26:17+5:30
पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.
गाव तिथे एसटी अशी शासनाची योजना आहे. त्याप्रमाणे गावात एसटी येऊ लागली. मात्र दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरामुळे राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हरदोना खुर्द उपरवाही या मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्याची कड खचली. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने डांबरी रस्ता आतून पूर्णत: पोखरला गेला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, यासाठी हा मार्ग मोठ्या वाहनांसाठी बंद केला असून शासनाची चंदनवाही - मंगी मार्गे उपरवाही आणि हरदोनावरून गडचांदूरला जाणारी एसटी बंद झाली आहे.
शिक्षणासाठी या परिसरातील विद्यार्थ्यांना गडचांदूरला जावे लागते. परंतु रस्त्याअभावी बस बंद झाली असून नागरिकांना व विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करीत शिक्षणासाठी जावे लागत आहे.
एकीकडे शासनाने रस्ते हॉयटेक करण्याचा संकल्प केला असतानाच राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उपरवाही - हरदोना खुर्द मार्गाची कड खचली असून आतून रस्ता पोखरला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी हरदोना येथील नागरिक मुर्लीधर, मांडवकर, संतोष बलकी, यादव ठेंगणे, प्रवीण खाटे, कमलेश राजूरकर, महेंद्र बावणे, नरेश राजूरकर, दशरथ ढवस आणि गावकरी व विद्यार्थ्यांनी केली आहे.
बांधकाम विभागाला जाग येणार केव्हा ?
दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुराने उपरवाही हरदोना खुर्द रस्त्याची कड खचून रस्ता आतून पाण्याच्या प्रवाहाने पोखरला. मात्र दुरूस्ती करण्याचे सौजन्य अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही.