वरोऱ्यातील शेतकऱ्याने विकसित केले ‘एसबीजी’ सोयाबीन वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 07:59 PM2018-06-18T19:59:01+5:302018-06-18T19:59:09+5:30

वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी सतत सात वर्षांपासून १५ एकर शेतीमध्ये प्रयोग करून ‘एसबीजी-९९७’ हे सोयाबीन वाण विकसित केले़ आहे़.

SBG 'soybean varieties developed by farmer in Chandrapur district | वरोऱ्यातील शेतकऱ्याने विकसित केले ‘एसबीजी’ सोयाबीन वाण

वरोऱ्यातील शेतकऱ्याने विकसित केले ‘एसबीजी’ सोयाबीन वाण

googlenewsNext
ठळक मुद्देसात वर्षांच्या प्रयोगाची फलश्रुतीरोग प्रतिकारशक्ती सर्वोत्तम असल्याचा दावा

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तुटपुंज्या संशोधन साधनांवर मात करून निरीक्षणशक्ती व शेती-माती, हवामान आणि पर्जन्यमानाच्या बारकाव्यांचा अभ्यास करून वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे (शिक्षण इयत्ता नववी) यांनी सतत सात वर्षांपासून १५ एकर शेतीमध्ये प्रयोग करून ‘एसबीजी-९९७’ हे सोयाबीन वाण विकसित केले़ आहे़. हे वाण केसाळ स्वरूपाचे असून १०६ दिवसांत उत्पन्न होते़ पांढरी माशी व मावा तुडतुड्यांचा या वाणाला प्रादुर्भाव होत नाही़ रोगप्रतिकारशक्ती सर्वोत्तम असल्याने आंतरपिकालाही पूरक असल्याचा दावा गरमडे यांनी केला आहे़.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासून सुमारे दोन हजार फु टांवर सुरेश गरमडे यांची १७ एकर शेती आहे. यामध्ये सात वर्षांपूर्वी पारंपरिक पिके घेतली जात होती. समाधानकारक पीक हाती न आल्याने नाविण्यपूर्व पिकांचा शोध त्यांनी सुरू केला. २०११ च्या खरीप हंगामात त्यांनी सोयाबीनची लागवड केली. दरम्यान, या पिकातील दोन झाडे नाविण्यपूर्व वाटल्याने गरमडे यांनी दुसऱ्या वर्षांपासून त्या बियाण्यांची स्वतंत्र लागवड करणे सुरू केले. अशातच दरवर्षी लागवडीचे क्षेत्र वाढवून त्यावर संशोधन सुरू केले. गावातील अन्य शेतकऱ्यांचे बदलत्या वातावरणामुळे प्रचंड नुकसान होत असताना गरमडे यांच्या उत्पादनात मात्र दरवर्षी भर पडत होती. त्यामुळे १५ ते १७ एकरमध्ये सोयाबीन लागवड सुरू केली. अल्प पाऊस, उष्णता, कीडींचा प्रादुर्भाव या तिन्ही घटकांचा गरमडे यांच्या पिकावर कोणताही अनिष्ट परिणाम झाला नाही. गतवर्षीच्या खरीप हंगामात या वाणाचे अंतिम निष्कर्ष हाती आले. त्यानुसार हे वाण १०६ दिवसांमध्ये पूर्ण विकसीत होवून उत्पन्न हाती येते. एकरी १७ क्विंटल असे उत्पन्नाचे प्रमाण असून मावा तुडतुडे, पांढऱ्या माशीसह सर्व प्रकारच्या किडींचा या वाणावर अनिष्ठ परिणाम होत नाही. विकसित केलेल्या वाणाला त्यांनी ‘एसबीजी-९९७’ म्हणजे ‘सुरेश बापूराव गरमडे-९९७’ हे नाव दिले आहे.

‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रतिकार
प्रतिकूल हवामानातही एकरी १७ क्विंटल उत्पन्न देणारे सोयाबीन वाण राज्यातील कोणत्याही कृषी विद्यापीठातील संशोधकांनी अद्याप शोधले नाही. त्यामुळे कृषी विभागातील तालुका ते जिल्हास्तरावरील बहुतेक सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी सुरेश गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली. ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रतिकार व कीडीला बळी न पडणाºया ‘एसबीजी-९९७’ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत वाढते. एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. सलग सात वर्षांपासून एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले आहेत.

पेटंटसाठी पाठविला प्रस्ताव
एचएमटी धानाचे जनक दादाजी खोब्रागडे यांनी धानाच्या वाणांचे संशोधन करूनही प्रशासनातील काही झारीच्या शुक्राचार्यांनी मोठी उपेक्षा केली होती. मात्र, जिल्ह्यातीलच काही कृषी अधिकाऱ्यांनी सुरेश गरमाडे यांच्या संशोधनाला पाठबळ देवून पेटंटसाठी प्रस्ताव करण्यासंदर्भात पाठबळ दिले. मार्गदर्शन केले. परिणामी पीक वाण शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात गरमडे यांनी मागील महिन्यात प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात सादर करण्यात आला आहे. पेटंटसंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव म्हणाले, शेतात स्वतंत्र वाढविलेल्या, विकसित केलेल्या तसेच वेगळे गुणधर्म असलेल्या वाणाला मान्यता मिळाल्यास सदर शेतकऱ्यांचा या वाणावरील हक्क १५ वर्षे अबाधित राहणार आहे.

- तरच देणार इतरांना बियाणे
दादाजी खोब्रागडे यांच्या कार्यापासून जिज्ञासा निर्माण झाली. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व सोयाबीन वाणांचा सखोल अभ्यास केला. दादाजींच्या धान संशोधनाचा काहींनी गैरफ ायदा घेतला. हा प्रकार घडू नये, यासाठी मी विकसित केलेले सोयाबीन वाण अद्याप कुणालाही दिले नाही. पीक वाण शेतकरी हक्क कायद्यानुसार नोंदणी झाल्यानंतरच हे वाण उपलब्ध करू देणार आहे.
- सुरेश गरमडे, वायगाव (भो.)

Web Title: SBG 'soybean varieties developed by farmer in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती