ंअंत्यविधीसाठी लाकडांचा तुटवडा
By admin | Published: February 17, 2017 12:57 AM2017-02-17T00:57:19+5:302017-02-17T00:57:19+5:30
मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात.
२० किमीहून पुरवठा : महिनाभरापासून साठा नाही
चंद्रपूर : मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात. हिंदूत मृत देहाला अग्नि देऊन पंचतत्वात विलीन केले जाते. मात्र, राजुरा परिसरातील मृतांच्या आप्तांना एका नव्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. वनविभागाच्या लाकूड विक्री केंद्रात गत महिनाभरापासून जळाऊ लाकूडच उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी लाकडांचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडून लाकडांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
राजुरा येथे वनविभागात लाकूड विक्री केंद्र आहे. मृतदेह जाळण्यासाठी येथून लाकडे विकत घेतली जातात. यापूर्वी अंत्यविधीकरिता जळाऊ लाकडे मिळाली नाहीत, असा प्रसंग आला नाही. मागील एका महिन्यापासून येथे लाकडांचा साठाच शिल्लक नाही. १३ जानेवारीला सोमनाथपूर वॉर्डातील निवासी कोवे यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी लाकडे आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक वनविभागाच्या विक्री केंद्रात गेले. तेव्हा गत एका महिन्यांपासून लाकूड उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यांना २० किलोमीटर अंतरावरील कळमना बिटातून लाकडे आणावी लागली. आता मंगळवारला तालुक्यातील पंचाळा गावचे निवासी नीलकंठ कोडापे आणि यादवराव चोतले या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठीही विक्री केंद्रात लाकूड मिळाले नाही. जळाऊ लाकडे होती. ती सार्वजनिक स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गावागावात भोजनावळी उठल्या. त्यासाठी तेथे जळाऊ लाकडांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असावी, असा अंदाज आहे. लाकडांसाठी स्थानिक नेतेमंडळी दबाव टाकत असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे समजते. वनविभागाच्या आलापल्ली डेपोकडे जळाऊ लाकडांची मागणी मागील एका महिन्यापूर्वी केली आहे, अशी माहिती वनविभाग देत आहे. अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे राजुरा परिसरातील मृत व्यक्तीला मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. यासंदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गांभीर्याने पावले उचलून लवकरात लवकर लाकडे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)