निसर्गरम्य सिद्धेश्वर देवस्थान उपेक्षित
By admin | Published: September 20, 2015 01:27 AM2015-09-20T01:27:40+5:302015-09-20T01:27:40+5:30
शासन गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. योजना गावकऱ्यांपर्यंत पोहचली तर त्या योजनेचे सार्थक, नाहीतर पर्यायाने त्या गावाचा विकास खुंटतो.
देवाडा : शासन गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. योजना गावकऱ्यांपर्यंत पोहचली तर त्या योजनेचे सार्थक, नाहीतर पर्यायाने त्या गावाचा विकास खुंटतो. देवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर देवस्थानापर्यंतही शासनाची कृपादृष्टी पडलेली नाही. पुरातन काळातील व राजुरा येथून १८ किमी अंतरावरील तेलंगाना मार्गावरील सिद्धेश्वर धार्मिक स्थळ व देवस्थान आहे. मात्र हे देवस्थान सध्या उपेक्षित आहे.
सिद्धेश्वर फाट्यावरुन दोन किमी अंतरावर जंगलाच्या मध्यभागी हिरव्यागार रानात जंगली प्राणी असलेल्या या ठिकाणी महादेव शंकर यांचे मंदीर आहे. सिद्धेश्वर देवस्थान म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात व तेलंगाणात हे स्थळ प्रसिद्ध आहे. परंतु मागील वर्षापासून सिद्धेश्वर देवस्थानाचे बांधकाम कासवगतीने सुरू असून या बांधकामाला पूर्णपणे यशस्वी करण्याकरिता दोन वर्ष लागेल, असे बोलले जात आहे. यामुळे देवाडा सिद्धेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होताना दिसून येत आहे. सिद्धेश्वर देवस्थानात प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता सध्या देवस्थानाचे बांधकाम पूर्णपणे बंद अवस्थेत आढळून आले आहे. पाऊस आला की मंदिराच्या आतमधून पाणी गळते. पावसाचे पाणी मंदिरामध्ये साचून राहते. तसेच एक हातपंप आहे आणि पुरातन काळातील जलकुंडात पाणी पिण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी राहते. परंतु जलकुंड लहान स्वरूपात असल्यामुळे त्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. हजारो भाविक देवदर्शनाला या ठिकाणी येतात. महाशिवरात्री, श्रावण महिण्यात मोठ्या संख्येने नागरिक येऊन यात्रा भरविण्यात येते. परंतु पाण्याची टंचाई भासते. अशा अनेक समस्या आहेत. सिद्धेश्वर देवस्थान कमेटीतर्फे देखरेखच केली जात नसल्याने कमेटी फक्त कागदावरच आहे, असे दिसून येत आहे. तरी सिद्धेश्वर देवस्थान कमेटीला बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या परिश्रमाने पुरातन काळातील सिद्धेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७८ लाखांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या पुरात्तत्व विभागाकडून मंजूर झाला. सन २०१२-१३ पासून मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे तीन वर्ष लोटूनही काम अपुरेच आहे. जी दूरदृष्टी ठेवून मंदिराचा जिणोध्दार होत आहे, ती अपुरी राहते की काय, असे दिसते.
प्रेमीयुगलांचे जत्थे सिद्धेश्वर देवस्थानाकडे !
शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांचा मुलींशी संपर्क येतो. यातूनच त्यांची मैत्री होते आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेम संबंधात होते. मग महाविद्यालयातील गर्दीतून वाट काढत ही तरुणाई एकांताच्या शोधात शहराबाहेर जाऊ लागते. सध्या अशी प्रेमीयुगलांची जोडपी सिध्देश्वर देवस्थान परिसरात फिरताना दिसून येत आहेत. मात्र हा एकांत त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. होय, अशाच प्रेमीयुगलांवर काही विकृत प्रवृत्तीच्या टोळक्यांची नजर असून अनेक जोडप्यांना वाईट अनुभव आला असला तरी बदनामीच्या भीतीपोटी अनेक प्रकरणे बाहेरच आली नाही. परिणामी विकृतांची हिंमत वाढत आहे.