निसर्गरम्य सिंधबोडी तलाव उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:02 PM2018-01-28T23:02:20+5:302018-01-28T23:03:09+5:30
तालुक्याला समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. कचेपार जंगलातील निसर्गरम्य सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो.
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : तालुक्याला समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. कचेपार जंगलातील निसर्गरम्य सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. त्यामुळे तलावास विकसीत करण्यासाठी शाासनाने आराखडा तयार करावा, अशी मागणी तालुक्यातील वन्यप्रेमी संघटनांनी केली आहे.
सिंदेवाही तालुका वनवैभवाने नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव असून सभोवताल घनदाट जंगल आहे. विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी या तलावावर येतात. प्रत्येक हंगामा विदेशी पक्षीदेखील पिंगा घालतात. पर्यटनाच्या दृष्टीने योग्य ठिकाण असतानाही वनविभागाने सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर एक रमणीय स्थळ म्हणून हमखास प्रसिद्धिस येऊ शकतो. सिंदेवाहीपासून १० किलोमीटर अंतरावर कचेपार हे गाव घनदाट जंगलात आहे.
कचेपारपासून पूर्वेस ५ किलोमीटर अंतरावर सिंधबोडी तलाव केवळ ५ किेमी अंतरावर येते. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी आहे तलावास लागूनच खैरी व पवनपार तलाव आहेत. त्यामुळे सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध होतो. तसेच तलावाला लागून डोंगर असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या परिसरात मुक्तपणे हिंडणारे पशुपक्षी व वनराई पाहून पर्यकांची मने आकर्षित होतात. ४९६ चौरस हेक्टर क्षेत्रातील कचेपार जंगल सिंधबोडी तलाव १० हेक्टर परिसरात पसरलेला आहे. तलावात बारामाही जलसाठा उपलब्ध असते.
तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. त्यात विविध वन्य प्राण्यांचा नेहमी संचार असतो. परिणामी मोठ्या संख्येने तृणभक्षी, मासभक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी येतात. औषधोपयोगी वनस्पती व मोठ्या वृक्षांची समृध्दता आहे. या परिसरात रानगवे, हरिण, सांबर, चितळ, भेडकी आदी तृणभक्षी प्राणी सहजपणे पाहायला मिळतात. साग, येन, बिजा, मोह, सालई, धावडा, किन्ही, पळस, अंजन, आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी व इतर फळ झाडाची मोठी विपूलता दिसून येते. या तलवात परदेशी पाहुणे लाल तोंडाचा करकोचा, पांढरा बडा, बारडी, पानकवडी, आस्ट्रेलियन आणि भारमातील अनेक प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करताना आढळून येतात.
हरिण, सांबर, चितळ, चौरसिंग, भेडकी, माकड, रानगवे, रानडुक्कर, ससा, अस्वलांचे कळप सहजपणे दिसतात. मोर, लांडोर, लावे, तितीर पक्ष्यांचा आवाज नेहमीच येत राहतो. लांब पिसारा असलेले मोर मनसोक्त फिरताना आढळून येतात. सायंकाळी पट्टेदार वाघ, बिबट, तडस, रानमांजर, रानकुत्रे व कोल्हा शिकारीच्या शोधात जंगलात भटकत असतात. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी पाहावयास मिळतात.
सर्व प्रकारचे वन्यप्राणी या तलावावर पाणी पिण्याकरिता येतात. याठिकाणी २४ तास वनकर्मचारी गस्त घालतात. बऱ्याच ठिकाणी कॅमेरा लावल्याने शिकारीला आळा बसला आहे. राज्य पर्यटन विभागाने इको टूरिझम आणि जंगल सफारी सारखे उपक्रम सुरू केल्यास या परिसराचा मोठा विकास होऊ शकेल. स्थानिक लोकप्रतिधिंनी या परिसराचा प्रश्न शासनाकडे मांडल्यास विकासाला चालना मिळू शकते, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
विकासासाठी शासनाने निधी द्यावा
सिंधबोडी तलावाच्या विकासासाठी शासनाने निधी दिल्यास या परिसराला चालना मिळू शकते. पर्यटन क्षेत्र झाल्यास शालेय विद्यार्थी व पर्यटकांना याठिकाणी सहलीचा आनंद घेता येईल. या वन परिसरात आकर्षक मचान तयार करण्यात आले. मचानीवरून विविध प्रकारचे वन्यप्राणी व पशुपक्षी पाहावयास मिळतात. वनविकास महामंडळाने २०१६ मध्ये गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर निसर्ग पर्यटन भ्रमंती कार्यक्रमाला सुरुवात केली होती. परंतु, सध्या पर्यटन भ्रमंती बंद आहे. शासनाने निधी देऊन विकासाचे प्रकल्प राबविल्यास हे क्षेत्र जिल्ह्यातील नागरिकांंसाठी आकर्षणाचा केंद्रबिंंदू ठरू शकते. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करावी, अशी मागणी प्रभात बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रितेश घूमे यांनी केली आहे.