ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:55+5:30
मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ३० मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.८२ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ९७४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९०.६० टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी महक प्रकाश उके ही ९८.४६ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाची साक्षी अरुण कुंभारे ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ९४.४६ टक्के गुण घेत द्वितीय आली आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रथम अमरदीप लोखंडे हा ९४ टक्के घेऊन तिसऱ्या स्थानी आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २६ हजार ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण एक हजार २१९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. सात हजार ४८२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १५ हजार ८६९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ४८१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विदर्भाचा निकाल बघितला तर चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा विदर्भात पाचव्या क्रमांकावर होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली आहे. ही बाब जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आहे.
पुन्हा एकदा मुलीच अव्वल
मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ३० मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.८२ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ९७४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ९१५ मुलींनी परीक्षा दिली. यातून १३ हजार १२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९३.५१ आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक
मागील वर्षी वाणिज्य शाखेने निकालात बाजी मारली होती. मात्र यावर्षी बारावी परीक्षेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून एकूण ११ हजार ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ११ हजार ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून १० हजार ८१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ७२५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून तीन हजार ५५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेची टक्केवारी ९७.९६ आहे. कला शाखेतून एकूण १४ हजार १९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ९१० विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी ११ हजार ८६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ८५.३१ आहे. वाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार २२५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी दोन हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.०१ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील एक हजार ५७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ८५.२२ इतकी आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडी
जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती, गोंडपिपरी, कोरपना, सावली, मूल, नागभीड, पोंभूर्णा या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. त्या तुलनेत भद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरा या शहरी भागातील मुले निकालात मागे पडली आहे.
जिल्ह्यातील ५८ शाळांचा निकाल १०० टक्के
मागील वर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८०.८९ टक्के लागला होता. मात्र यावर्षी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदा ९०.६० टक्के निकाल लागला. विशेष म्हणजे तालुक्यांसह अनेक महाविद्यालयांनीही यंदा चांगला निकाल दिला आहे. जिल्ह्यात एकूण ५८ महाविद्यालयांनी यावर्षी १०० टक्के निकाल दिला आहे
चिमूर तालुका माघारला
यंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात गोंडपिपरी तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला. जिवती तालुका (९४.३१ टक्के ) दुसºया तर चिमूर तालुका ८५.७९ टक्के घेऊन पिछाडीवर गेला आहे.