शेतशिवारात दरवळणार फुलाचा सुगंध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:40+5:302021-08-01T04:25:40+5:30
राजकुमार चुनारकर चिमूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांना बळकटी मिळावी, याकरिता फूल शेतीचा समावेश करण्यात आला आहे. ...
राजकुमार चुनारकर
चिमूर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांना बळकटी मिळावी, याकरिता फूल शेतीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात फूल शेतीला चालना मिळणार आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी फूल शेती करण्याबाबत नोंदणी केल्यावर रोहयोंतर्गत निधी मिळणार आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत निर्मिती, अमृत कुंड, विहीर पुनर्भरण, शेततळे, शेळी म्हशीचे गोठे, रेशीम उद्योग आदी शेतीशी संबंधित बाबींचा समावेश आधीच करण्यात आला आहे. आता यामध्ये फूल शेतीचाही समावेश करण्यात आला आहे. गुलाब, निशिगंधा, मोगरा या फुलांची शेती रोजगार हमी योजनेंतर्गत करता येणार आहे. पारंपरिक शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पन्न घटले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची गरज आहे. त्याकरिता फूल शेती हा उत्तम पर्याय राहणार आहे. फूल शेतीचा रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फुलांना वर्षभर मागणी राहते. दिवाळी, तसेच विवाह समारंभाच्या सिझनमध्ये फुलांचे भावही गगनाला भिडले असतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
बॉक्स
असा देता येणार प्रस्ताव
१५ ऑगस्ट रोजी राज्यात गावागावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत शेतकऱ्यांना फळ शेती करण्याबाबत मागणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्यावर ग्रामसभेत तयार करण्यात येणाऱ्या ठरावामध्ये त्याचा समावेश करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येतो. विभागीय आयुक्तांनी मंजूर केल्यानंतर उपाययोजना राबविण्याकरिता निधी दिला जातो. या योजनेतून जिल्ह्यात गुलाब, मोगरा, निशिगंधाचा सुगंध शेतशिवारात दरवळणार आहे. हाच सुगंध शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत देणारा ठरणार आहे.
कोट
गुलाब, निशिगंधा, मोगरा या फुलांचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत नोंदणी करून आराखड्यात समावेश करून घ्यायला हवा. फुलांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा.
- ज्ञानदेव तिखे
कृषी अधिकारी,चिमूर.