१५ लाखांच्या वसुलीसाठी अडीच लाख रुपयांची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:29+5:302021-03-13T04:51:29+5:30
अमोद गौरकर शंकरपूर : मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजली जाणारी आणि नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतने गाळेधारकाकडे थकीत रक्कम ...
अमोद गौरकर
शंकरपूर : मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजली जाणारी आणि नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतने गाळेधारकाकडे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी करवसुली लकी ड्रा ही नवीन अभिनव योजना अमलात आणलेली आहे. १५ लाखांच्या थकीत करवसुलीसाठी ही अडीच लाखांची योजना असणार आहे.
शंकरपूर ग्रामपंचायतमार्फत ९२ गाळेधारक आहेत. या ९२ गाळेधारकांकडे आतापर्यंत पंधरा लाख रुपयांचे मासिक किराया थकीत आहे. ते पंधरा लाख रुपये वसूल करण्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतने कर वसुली लकी ड्रा योजना अमलात आणलेली आहे. मार्च २०२१ पर्यंत गाळे व्यावसायिक संपूर्ण थकीत व चालू किराया भरतील, त्या व्यावसायिकांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे. या लकी ड्रामध्ये प्रथम बक्षीस टू व्हीलर आहे. तर इतर बक्षिसात टीव्ही दोन, फ्रीज चार, दोन वाशिंग मशीन, कूलर, तीन कपाट, दोन सोफा, दोन डायनिंग सेट, चार शेगड्या, सहा सिलिंग फॅन, सहा टेबल फॅन, १५ टी टेबल, २१ खुर्ची आणि २१ वाॅटर कॅन अशी एकूण ९२ बक्षिसे गाळे व्यावसायिकांसाठी काढण्यात येणार आहे. प्रत्येक गाळेधारकांना हमखास बक्षीस मिळणार आहे. ग्रामपंचायतीने पंधरा लाख रुपये वसुलीसाठी अडीच लाख रुपयांची लकी ड्रा योजना आणलेली आहे. हे अडीच लाख रुपये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या स्वनिधीतून ही योजना अमलात आणली आहे.
बॉक्स
अशी योजना राबविणारी एकमेव ग्रामपंचायत
अशी गाळेधारकांसाठी ही अभिनव योजना राबवणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. या योजनेमुळे गाळेधारक मासिक किराया भरतील, ही आशा ग्रामपंचायतला आहे. या योजनेत काही गाळेधारकांमध्ये खुशी तर काही गाळेधारकांमध्ये गम दिसत आहे. बऱ्याच वर्षापासून गाळेधारकांकडे मासिक किराया थकीत आहे.
कोट
वारंवार नोटीस पाठवूनही हे गाळेधारक मासिक किराया भरत नसल्यामुळे कर वसुली लकी ड्रॉ योजना आणलेली आहे. ही योजना सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या स्वनिधीतून आम्ही अमलात आणणार असून, १५ एप्रिलला याची सोडत काढण्यात येणार आहे. ज्या गाळेधारकांनी १५ एप्रिलपर्यंत मासिक किराया भरला नाही, त्यांच्यावर कायदेशीर जप्तीची व वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे.
-साईश सतीश वारुजूकर, सरपंच शंकरपूर.