दर शनिवारी शिष्यवृत्तीची तासिका होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:40 PM2019-07-08T22:40:04+5:302019-07-08T22:40:20+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी घटत आहे. शिवाय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्व जि.प. प्राथमिक शाळेमध्ये दर शनिवारी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी एक तासिका राखून ठेवावे, असा निर्णय जि.प. शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी घटत आहे. शिवाय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्व जि.प. प्राथमिक शाळेमध्ये दर शनिवारी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी एक तासिका राखून ठेवावे, असा निर्णय जि.प. शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी तज्ज्ञ शिक्षक जे. टी. पोटे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे व शिक्षण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती सहारे यांनी नवीन शैक्षणिक सत्राबाबत जि.प. शाळांमध्ये नवीन कोणते उपक्रम राबवावे, यासंदर्भात सदस्यांशी चर्चा केली. मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती परिक्षेचा टक्का घटला. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. अभ्यासक्रमाचे नियोजन करताना दर शनिवारी शिष्यवृत्तीसाठी एक तासिका राखून ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मुख्याध्यापिकांनी याबाबत तातडीने नियोजन करावे, असेही सूचविले. उपस्थित सदस्यांनी या मुद्याला सहमती दिली. त्यामुळे ठराव पारीत करण्यात आला. एका वर्गातून शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये कार्यालयीन कामालाा आल्यास शिक्षकांनी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी, ई-लर्निग संच बंद असल्यास तातडीने सुरू करावे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जि.प. शाळांचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक महिन्यातून काही विशिष्ट दिवसांमध्ये शाळांची भेट घेवून समस्या जाणून घेणार आहेत.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणी येवू नये, यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद प्रमुख व मुख्याध्यापकान्ांी दक्षता घ्यावे, अशा सूचना देण्यात येणार आहेत. यावेळी शालेय गणवेश वितरण व पाठ्यपुस्तकांबाबतही चर्चा झाली.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून विशेष तासिका घेण्याचा ठराव पारित केला. प्रत्येक शाळेने याची अंमलबजावणी करावी.
- कृष्णा सहारे, उपाध्यक्ष, जि.प.