स्कूल बस चालकांनी बदलविला व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:48+5:302020-12-15T04:43:48+5:30

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कुलबस चालक सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. ...

School bus drivers changed business | स्कूल बस चालकांनी बदलविला व्यवसाय

स्कूल बस चालकांनी बदलविला व्यवसाय

Next

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कुलबस चालक सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहे. रोजगार पूर्णपणे थांबल्याने आता अनेकांनी उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसाय सुरु केला आहे. दरम्यान, स्कूलबस मालकांचेही हाल सुरू असून वाहनांचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेत ते पडले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात स्कूल बस, व्हॅनची संख्या ५२० च्या घरात आहे. या वाहनांवरील चालक, वाहकांची सध्या आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. वाहनातून येणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे त्यांना चालकांना वेतन देणे थांबविले आहे. दुसरीकडे वाहने मागील आठ ते दहा महिन्यांपासून जागेवरच थांबून असल्यामुळे ते खराब होत आहे. अनेक बसच्या बॅटऱ्या सुद्धा उतरल्या आहे. आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही स्कूल बस बंदच आहे. दरम्यान, शाळा सुरू होऊन बस रस्त्यावर आल्या तरीही फिटनेट सर्टीफिकेट, फायर सर्टिफिकेट, पीयुसी, पासिंग, इन्सुरन्स आदी नव्याने परवाने काढावे लागणार आहे. यामध्ये ३० ते ५० हजारा पर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. त्यातच कर्ज काढून बस खरेदी केल्यामुळे बॅंक, फायनान्स कंपन्यांकडून सध्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे हस्ते भरणे सध्यातरी कठीण झाले आहे. दरम्यान काही बस मालक तसेच चालकांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

----

५२० शहरातील स्कूल बसची संख्या

-------

बाॅक्स

मिळेल ते काम करून जीवन जगणे सुरू

शाळा बंद असल्यामु‌ळे स्कूलबस चालक, वाहकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेकांचे वेतनही बंद झाले आहे. दरम्यान, मिळेल ते काम करून कुटुंबाचे पालन पोषण करणे सुरू करण्यात आले आहे. मात्र दुसरे कामही योग्य पद्धतीने जमत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही चालकांनी किरायाणे ऑटो घेऊन चालविणे सुरू केले आहे. तर काही रोजमजुरीचा मार्ग पत्करला आहे.

कोट

स्कूलबस, व्हॅन बंद असल्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे मिळेल तो रोजगार करणे सुरू आहे. ऑटो किरायाणे घेऊन तोही चालविला. मात्र यातही पाहिजे तसे प्रवासी मिळत नसल्यामुळे रोजीही निघणे कठीण झाले आहे. .

-व्ही. एस. पाटील

स्कूलव्हॅन चालक

--

कोट

मागील अनेक महिन्यांपासून बस जागच्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे वेतनही बंद झाले आहे. कामच नाही तर वेतन तरी कसे मागणार. परिणामी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.खासगी वाहनांवर चालक म्हणून काम सुुरू केले आहे. मात्र दररोज काम मिळत नाही.

- धर्मा वनकर

स्कूलबस चालक

----

मागील आठ ते दहा महिन्यांपासून स्कूल बस, व्हॅन बंद आहे. यामुळे आर्थिक आवक पूर्णपणे बंद झाली आहे. बॅंकेचे कर्ज वाढत आहे. त्यामुळे ते कसे भरायचे असा प्रश्न आहे. शासनाने लाॅकडाऊनमधील कर्जावरील हप्ते माफ करून दिलासा देणे गरजेचे आहे.

संदीप वाळके

चंद्रपूर

---

कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. मात्र शाळा बंद असल्यामुळे स्कूलबस मालकांवर अतिरिक्त संकट कोसळले आहे. सध्या हळुहळू सर्वच सुरू झाले आहे. मात्र शाळा अद्यापपर्यंत सुरू झाल्या नाही. त्यामुळे बस बंद अवस्थेत आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

- रमेश राठोड

बसमालक, चंद्रपूर

Web Title: School bus drivers changed business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.