रखरखत्या उन्हात भरते सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा

By admin | Published: April 26, 2017 12:42 AM2017-04-26T00:42:23+5:302017-04-26T00:42:23+5:30

सध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे.

School of CBSE curriculum fills up in the sunlight | रखरखत्या उन्हात भरते सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा

रखरखत्या उन्हात भरते सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा

Next

भद्रावती शहरातील प्रकार : विद्यार्थी बेहाल, पालक चिंताग्रस्त
विनायक येसेकर भद्रावती
सध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत. मात्र येथील सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शासकीय केंद्रीय विद्यालयाचे सत्र दुपार पाळीतच सुरु आहेत. यामुळे विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.
भद्रावती शहरातील वातावरणाचा विचार केल्यास येथील शाळा सकाळ पाळीत घेणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे विदर्भात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढले आहे. या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या काळात थंड पेय घेण्याचाही सल्लाही दिल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाधिक असल्याची नोंद झाली. एवढ्या मोठ्या तप्त वातावरणात मात्र सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा व महाविद्यालये सुरु आहेत. या शाळांमध्ये वयाचे सहा वर्षापासून ते १८ वर्षापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा वातावरणात शिक्षण तर दूरच परंतु त्यांच्या शारिरीक, आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
वर्ग खोलीत साधे पंखे असल्याने ते वातावरणातील गरम हवा देतात. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. शाळा सुटल्यानंतर शाळेपासून घरापर्यंत प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या वाहनाने, आॅटो व स्कूल बसने जात असतात. प्रत्यक्ष या शाळांना भेट देवून तेथील मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, सर्कुलरनुसार आम्हाला शाळा सुरु ठेवावी लागते. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. एवढ्या उष्ण वातावरणात या भागातील शाळांना सुट्टी असने आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आमच्या पाल्यांची अवस्था पाहू जात नाही, असे मत पालकांनी व्यक्त केले. त्यामुळे केंद्र शासनाने येथील वातावरणाचा विचार करुन शाळेच्या वेळापत्रकात बद्दल करावा, जेणेकरुन उन्हाचा त्रास होणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाला देणार निवेदन
रखरखत्या उन्हात सीबीएससी अभ्यासक्रमाचे खासगी व शासकीय केंद्रीय विद्यालय सुरु असल्याने त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तप्त वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वातावरणात त्यांचे शिक्षणावर लक्ष लागत नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अतिवृष्टी किंवा बर्फवृष्टी झाली तर त्या-त्या भागातील स्थानिक प्रशासन शाळा बंद ठेवत असते. मग एवढ्या तप्त उन्हात या शाळाां सुट्ट्या का नाही, केंद्रीय शिक्षण विभाग जिल्हाधिकारी, ना. हंसराज अहीर यांना यासंदर्भातील निवेदन देणार असल्याचे भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे यांनी सांगितले.
अन्यथा आंदोलन करणार
वातावरणामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता केंद्र शासनाच्या सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हातही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिकत्तेवर परिणाम होत आहे. या शाळा राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरु ठेवाव्यात यासाठी संबंधीतांना निवेदन पाठविले जाईल. निवेदनाची दखल न घेतल्यास आपण आंदोलन उभारु, असा इशारा भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैणवार यांनी दिला आहे.

Web Title: School of CBSE curriculum fills up in the sunlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.