शाळा बंदच; शालेय वस्तूची विक्री ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:27+5:302021-08-15T04:29:27+5:30
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा यंदातरी सुरू होईल, अशी अपेक्षा शालेय वस्तूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना होती. ...
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा यंदातरी सुरू होईल, अशी अपेक्षा शालेय वस्तूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना होती. मात्र अद्यापही प्राथमिक शाळा व महाविद्यालये सुरू झाली नसल्याने शालेय वस्तूची विक्री ठप्प झाली आहे. परिणामी व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली होती. त्यामुळे व्यावसायिकांना शाळा-महाविद्यालये सुरू होतील या अनुषंगाने साहित्य बोलविले. मात्र आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर १६ ऑगस्टपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र काही दिवसानंतर शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपोआपच शालेय साहित्यांची विक्री घटली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने बुक, पेन, पुस्तकाची मागणीच नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. स्कूल बॅगची विक्री तर मागील दोन वर्षांपासून होतच नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा शाळा सुरू होणार या आशेने विविध साहित्य आणले होते. मात्र आता पुन्हा शाळा सुरू होण्यास किती दिवसांचा कालावधी लागतो ते सांगणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यामध्ये चिंता पसरली आहे.
कोट
दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात शालेय वस्तूसाठी पालकांची गर्दी असते. मात्र मागील दोन वर्षांपासून ग्राहक कमी झाले आहेत. यंदा शाळा सुरू होईल, अशा आशेने नवीन माल आणला. मात्र शाळाच सुरू नसल्याने खपच झाला नाही.
-सुधीर रायपुरे, विक्रेता