मुख्याध्यापकांसह शालेय कर्मचारी दिवसभर रांगेत
By Admin | Published: February 15, 2017 12:43 AM2017-02-15T00:43:02+5:302017-02-15T00:43:02+5:30
नागपूर विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्य केंद्रावर वाटप करण्यात येत आहे; ...
एकच खिडकी : १० व १२ वी परीक्षा साहित्याचे वितरण
चंद्रपूर : नागपूर विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्य केंद्रावर वाटप करण्यात येत आहे; मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एकाच खिडकीतून साहित्य वाटपामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसह शालेय कर्मचाऱ्यांना दिवसभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकासह शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळांचे १० वी व १२ वीच्या परीक्षेचे साहित्य वाटप व संकलन चंद्रपूर येथील ज्युबिली शाळेत जिल्हा संकलन केंद्रावरुन केले जाते. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेकडो मुख्याध्यापक व शालेय कर्मचारी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, तोंडी परीक्षेचे साहित्यासह इतर साहित्य घेण्याकरिता येतात. या संकलन केंद्रावर नागपूर बोर्डातर्फे अपुरे कर्मचारी पाठवित असल्यामुळे एकाच खिडकीतून साहित्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे गर्दी होऊन लांबच लांब रांगा लागतात. परिणामी सोमवारी या वाटप केंद्रावर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसह, लिपिक व इतर शालेय कर्मचाऱ्यांना साहित्य संपादन करण्यादिवसभर दिवसभर उन्हात रांगेत उभे रहावे लागले. त्यामुळे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, व लपिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील कर्मचाऱ्यांना साहित्य घेण्याकरिता रात्री उशिर झाल्याने गावी जाणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना मुक्काम ठोकवा लागला. परिणामी शिक्षकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
चंद्रपूर जिल्हा संकलन केंद्रावर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपूर, मूल, सावली, भद्रावती, वरोरा, पोंभुर्णा या तालुक्यातील शेकडो कर्मचाऱ्यांंना सकाळपासून रांगेत तासन- तास भर उन्हात उभे रहावे लागत असल्यामुळे या संकलन केंद्रावर नागपूर बोर्डातर्फे जादा कर्मचारी पाठवून वाटप केले जावे, अशी मागणी जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शालेय कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)